

हल्लीची जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. आला दिवस कसा जातो हे कळत नाही, असा अनेकांचा सूर असतो. मात्र रोजचा दिवस अधिक आरोग्यपूर्ण बनला तर आरोग्याच्या तक्रारी सहजगत्या टाळता येतात. दिवसाचे नियोजन आरोग्यदायी कसे करता येईल याविषयी…
सकाळी निसर्गातील आवाज ऐकून आणि उगवणार्या सूर्याचा प्रकाश अर्धवट उघडलेल्या डोळ्यांवर पडतो तेव्हा आपल्याला जाग येते. झोप आणणारे शरीरातील मेलाटोनिन नावाचे संप्रेरक स्रवणे थांबवण्याचा इशारा दिवसाचा सूर्यप्रकाश शरीराला देतो. फुलांच्या सान्निध्यात असताना जाग येतेे. तिचा मूड दिवसभर छान राहतो, असे हार्वर्डमध्ये झालेल्या अभ्यासावरून समोर आले आहे.
आपण नाश्त्याला योग्य पदार्थांची निवड केली तर दिवसाची सुरुवातच छान होते. त्यामुळे शरीराला गरजेइतकी ऊर्जा मिळते. त्यामुळे पोट उत्तम राहते आणि मूडही चांगला राहतो. हिरव्या पालेभाज्या, फळे, सायविरहित दूध, मैदाविरहित ब्रेड, कडधान्ये आणि उत्तम दर्जाची प्रथिने असणार्या तेलबिया, चिकन, मासळी यांचा समावेश न्याहारीमध्ये असावा. चहा किंवा कॉफी प्यायच्या आधी सर्वप्रथम एक ग्लासभर कोमट पाणी प्या. शक्य असल्यास लिंबू पिळून कोमट पाणी प्यावे. उत्तम चयापचय क्रियेसाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायची गरज असते.
बहुतांश आजारांचे मूळ हे बैठ्या जीवनशैलीमध्ये आहे. हृदयविकार आणि मधुमेहासारखे आजार जडण्यास ही जीवनशैली कारणीभूत ठरताना दिसत आहे. म्हणूनच कामात असताना दर अर्ध्या तासाने उठून उभे राहा, फोनवर बोलत असाल तर उभे राहा. पाणी पिणे, कचरा टाकणे या कामांसाठी दूर उठून जा. जिन्यांचा वापर करा. सकाळी फिरायला जा. थोडक्यात, शारीरिक हालचाली अधिकाधिक करा.
कार्यमग्न लोक जेवणाचा डबाही त्यांच्या टेबलवर बसूनच खातात. पण दुपारचे जेवण कामाच्या जागेच्या बाहेर घेतले तर त्याचे लाभ होत नाहीत, असे काही पाहण्यांमधून दिसून आले आहे. याचे कारण हा आहार घेताना मनावर कामाचा ताण असतो. म्हणूनच जेवण शांत ठिकाणी बसून घ्यावे. एकट्याने जेवण्यापेक्षा समूहाने जेवावे. टीव्ही पाहात जेवणे टाळावे. जेवणासाठी बसणार असाल ती जागा स्वच्छ आणि प्रसन्न असली पाहिजे. अंधार्या खोलीत बसून जेवू नका. रोजच्या जेवणामध्ये सत्त्वपूर्ण धान्यापासून बनलेला एक तरी पदार्थ तरी असलाच पाहिजे. तसेच उत्तम प्रथिनांचा साठा असलेली मासळी, अंडे किंवा शिजवलेली भाजी यांचा समावेश दुपारच्या जेवणात आवश्यक आहे.
ऑफिसमधून सर्व कामे बंद करून घरच्या दिशेने प्रवास सुरू केल्यावर ऑफिसचे विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. त्याऐवजी मुलांविषयी, घराविषयी किंवा आपल्या जोडीदाराविषयी विचार करा. घरी जाण्यापूर्वी थोडा व्यायाम करण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे हाडांची घनता आणि ताकद कायम राहील. तसेच रोजचे धावपळीचे आयुष्य काहीसे तणावमुक्त होईल.
ऑफिसचे काम संपल्यानंतरचा संध्याकाळचा- रात्रीचा वेळ कुटुंबासोबत, मित्रांसोबत गप्पागोष्टींमध्ये घालवा. वाचन करा. संगीत ऐका. त्यानंतर शांत झोप घ्या. झोपेचे एक नियमित वेळापत्रक बनवा. त्यात साधारण ज्या वेळेला आपण झोपू त्याच वेळेला सकाळी उठावे. झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी हलका आहार घ्या. या आहारामध्ये कार्बोहायड्रेट असावेत. त्यामुळे झोपेला आवश्यक असणार्या सेरोटोनिन नावाच्या रसायने शरीरात स्रवू लागतात. रात्रीचे जेवण जड असता कामा नये.
कामाला घराबाहेर पडण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे शांत बसा आणि ध्यानधारणा करा. सकारात्मक भावना, मानसिक स्थैर्य आणि उच्च लक्ष्य यांच्याशी निगडित असणार्या मेंदूतला बुद्धिमत्तेचा भाग विकसित होण्यासाठी किंवा तयार होण्याशी ध्यानधारणा निगडित असते.
डॉ. भारत लुणावत