

नवी दिल्ली : 'नगाधिराज' हिमालयाचे जगात एक वेगळे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान असलेला हा पर्वत अनेक नद्यांचे उगमस्थान असून वनौषधींनी संपन्न आहे. हजारो वर्षांच्या काळापासून हा पर्वत तपस्वी लोकांच्याही साधनेला आश्रय देत आला आहे. भगवंतांनी हिमालय ही आपलीच एक विभुती असल्याचे 'स्थावराणां हिमालयः' या शब्दांमधून गीतेत सांगितले आहे. जगातील सर्वात उंच दहा शिखरे हिमालयातच आहेत. आताही सातत्याने हिमालयाच्या उंचीत वाढ होत चालल्याचे दिसून आले आहे.
हिमालयाने त्याच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत 60 टक्के उंची गाठली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अद्यापही वाढ होतच आहे. सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी हिमालयाची उत्पत्ती झाली. भारतीय टेक्टोनिक प्लेटची युरेशियन टेक्टोनिक प्लेटशी टक्कर झाल्याने हिमालय तयार झाला व अजूनही तो वाढतच आहे. त्याची उंची वाढल्याने संशोधकही चकीत झाले आहेत. हिमालयाची उंची वाढण्याचे कारण, युरेशियन टेक्टोनिक प्लेट आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट सतत एकमेकांवर दबाव टाकत आहेत, धडकत आहेत. या टक्कर व दाबामुळे आसपासच्या भागात वारंवार भूकंप होत असतात.
हे भूकंप कधी तीव्र तर कधी सौम्य असतात. ब्राऊन युनिव्हर्सिटीतील प्रा. डॅनियल एनरिक इबारा यांनी सांगितले की हिमालय पर्वताची सरासरी उंची 20 हजार फूट असून जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माऊंट एव्हरेस्टची उंची 29,032 फूट आहे. हिमालयाची सुरुवातीची उंची भारतीय टेक्टोनिक प्लेटच्या सागरी भागाच्या दाबाने आली. त्यानंतर ज्यावेळी वरचा पृष्ठभाग घसरला त्यावेळी त्याला अधिक उंची मिळाली. हा वरचा पृष्ठभाग युरेशियन प्लेटसह हिमालयाला उंची देत आहे. 59 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेटस्च्या टक्करीमुळे हिमालयाची उंची एक किलोमीटरने वाढली होती. टेक्टोनिक प्लेटस्ची ताकद सतत वाढतच आहे. तेच हिमालयाची उंची वाढवत आहेत. दोन्ही खंड असेच एकमेकांना भिडत राहिले तर हा पर्वत असाच उंच होत राहील.