

लोणावळा (पुणे) : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रस्त्यावर येणाऱ्या खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवार पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः एक्सप्रेस हायवेच्या खंडाळा बोर घाट परिसरात वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवार, रविवार आणि महाराष्ट्र दिन सोमवारी आल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या जोडून आल्या आहेत. या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने शनिवारी सकाळपासून मुंबई – पुणे एक्सप्रेस वे जाम झाला आहे.
सदरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांकडून दहा दहा मिनिटांचे ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्वच्या सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत.यामुळे पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे, तर मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.
बोर घाट, खंडाळा महामार्ग पोलीस, लोणावळा, खोपोली, खालापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ, महाराष्ट्र सुरक्षा बळ, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करताना दिसत होती. महाराष्ट्र शासनाने मिसिंग लिंकचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून रस्ता सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करून वाहतूक कोंडीचा हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत.