मध्य प्रदेशात पावसाचा हाहाकार
इंदूर, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशात राजधानी इंदूरसह तब्बल 20 जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला आहे. बरगी धरणाचे सात दरवाजे उघडल्यामुळे नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक घरे कोसळली. खांडवा येथेही पावसाने लोकांची तारांबळ उडवली आहे. शुक्रवारी रात्री ओंकारेश्वर धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील जबलपूर नरसिंहपूर, रायसेन, नर्मदापुरम या नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. सप्टेंबर महिन्यात 7 ते 15 सप्टेंबर दरम्यान सर्वाधिक पाऊस झाला. गेल्या एका आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये 95 टक्के जास्त पाऊस झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सरासरी 45.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या 7 दिवसांत संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये 88.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील 24 तासांत मुसळधार
उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, मेघालय, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत सर्वसाधारण पाऊस होईल, असे सांगण्यात आले.
इंदूर शहराने मोडला 61 वर्षांचा उच्चांक
इंदूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसाचे शनिवारी सकाळी आपत्तीत रूपांतर झाले. चोवीस तासात सात इंचाहून अधिक पाऊस पडला आहे. शहरात 61 वर्षांत सप्टेंबरमध्ये एवढा पाऊस कधीच झाला नाही. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

