

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: पाथर्डीत सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने शहरवासियांना अक्षरश: जोडपून काढले. विजेच्या कडकडासह सुमारे दीड तास वरूणराजा बरसला. जोरदार झालेल्या पावसाने पाथर्डी शहरातील तळघरांतील दुकानांमध्ये पाणी शिरून मालाचे नुकसान झाले. शहरातील मुख्य चौकांमध्ये पाण्याची ठिकठिकाणी तळे साचले होते.
पावसाने उघडीप दिल्यानंतर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहरातील परीट नदीला पाणी येऊन राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल बंद झाला. पोळा मारुती जवळ या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम एक वर्षाहून अधिक काळ उलटूनही पूर्ण झालेले नाही. पुलाचा पर्यायी रस्ता पाण्याने वाहून गेला. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला. पुलाच्या कामासाठी मोठ्या वाहनांची वाहतूक एक महिन्यापूर्वी चिंचपूर रोड मार्गे मोहटादेवी फाट्यापासून पर्यायी मार्गने वळवली होती. मात्र या पुलाच्या पर्यायी रस्त्यावरून छोटी वाहने धावत होती. आता पूलच वाहून गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अमरधाममध्ये पाणी शिरले आहे.
नवीन बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मोठे पाण्याचे तळे निर्माण झाले होते. उपनगरांतील रस्ते चिखलमय बनले आहेत. शहरातील मुख्य चौकांमध्ये पाण्याची तळी साचली होती. शहरातील इंदिरानगर येथील मंगल नवनाथ पंडित यांचे घर पडून मोठे नुकसान झाले. घरावरचे पत्रे, विटा व इतर सामान घरात कोसळले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी साहित्य, दिवाळीसाठी भरलेला किराणा पूर्णपणे भिजून वाया गेला.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर येथील इजाज शेख मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंडित कुटुंबाला धिर देत मदत कार्य केले. प्रशासनाने पाहणी करून पंचनामा केला.
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वीज पडून राजू पटेल पठाण (वय 45, रा. डमाळवाडी, ता. पाथर्डी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.