

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला ओतूर, खामुंडी, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, मढ, पिंपळगाव जोगा, उदापुर गावांच्या परिसरात सोमवार १७ ऑक्टोबर रोजी सुमारे ३ तास अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खामुंडी येथील अनिल बोडके या शेतकऱ्याचे काढून ठेवलेले सोयाबीन व नुकतीच लागवड झालेले कांदा पीक पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पूर्णपणे वाहून जाऊन नष्ट झाले आहे. सोबतच परिसरातील झेंडू, फ्लावर, कोबी, चवळी, भुईमूग, मूग, तरकारी पिके चारा पिके यासह कांदा बियाणे रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
यावर्षी ओतूर परिसरात ढगफुटी सदृश्य विक्रमी पाऊस झाल्याने रस्त्यांना पुराचे स्वरूप आले होते. परिणामी अनेक दुकानात व घरांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. कांदा बियाणे रोपवाटिकेत पाणी साठल्याने व पावसाचा मारा बसल्याने कांदा बियाणे रोपे सडू लागली आहेत. यंदा शेतकऱ्याच्या हातात भांडवलही उरलेले नसल्यामुळे शेतकरी पुरता कर्जबाजारी झाला आहे.