Heart disease in women : स्त्रियांमधील हृदयविकार

Heart disease in women : स्त्रियांमधील हृदयविकार
Published on
Updated on

हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍यांची वाढती संख्या ही आज संपूर्ण जगापुढील एक मोठी चिंता बनली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस)तर्फे करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार, हृदयरोगाने ग्रस्त असणार्‍या महिलांपैकी पन्नास टक्के महिलांचे वेळेवर निदान झालेले नसते किंवा त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत, असे दिसून आले आहे.

हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍यांतील 70 टक्क्यांपेक्षा अधिक लक्षणांमध्ये महिलेचा मृत्यू होण्याचा संभव असतो. ही लक्षणे धोक्याची घंटा देणारी असूनही, त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे.

महिलांमधील लक्षणे सहजपणे कळून येत नसली, तरीही बर्‍याच महिलांना तातडीने हृदयरोगावरील औषधोपचारांची गरज असतानाही त्यांना परत पाठवले जाते. हृदयविकारात छातीत दुखणे हे प्राथमिक लक्षण आहे. पण, महिलांमध्ये छातीत दुखणे हे लक्षण आढळून येतेच असे नाही. बर्‍याचदा डॉक्टर हृदयविकार तज्ज्ञ नसतील तर हृद्रोगाची लक्षणे दुर्लक्षली जातात. महिलांमध्ये जेव्हा छातीत कळ येणे असे लक्षण दिसले तरीही ते अपचन किंवा स्तनांमधील दुखणे असावे, असे समजले जाते. त्यामुळे महिलांमधील हृदयविकाराचे निदान होण्यास बराच उशीर होतो. हृदयविकारावरील उपचारांमध्ये योग्य वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेत उपचार झाल्यास रुग्णाचे प्राण निश्चितपणाने वाचवता येऊ शकतात. त्याचबरोबर आपण वैयक्तिक पातळीवर काही बदल स्वतःमध्ये करून घेतल्यास त्याचाही उपयोग हृदयविकार टाळण्यासाठी होऊ शकतो.

आपल्याकडे मुळातच महिलांच्या आरोग्याच्या काळजीबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. महिला सगळ्या कुटुंबाची काळजी करत असतात. त्यांच्या वेळा पाळतात; पण तेच स्वतःच्या खाण्याकडे दुर्लक्ष करत असतात. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष हाही एक मोठा भाग आहे. हृदयरोगाचा धोका महिलांना अधिक असतो. महिलांमधील अ‍ॅस्ट्रोजेन नावाचे एक हार्मोन शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी उंचावत असते तर वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करत असते. पण, स्त्रियांच्या रजोनिवृत्तीनंतर हे हार्मोन स्रवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे महिलांची निसर्गदत्त सुरक्षा कमी होते. रजोनिवृत्तीच्या दहा वर्षांनी महिलांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने धमन्यांमधील काठिण्य वाढते त्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होत असतो. त्यामुळे पन्नाशीनंतर महिलांनी कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यांची नियमित तपासणी करून घ्यावी. गेल्या तीन वर्षांमध्ये महिलांमधे हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हृदयविकाराचे वेळेत निदान झाले, तर उपचारही योग्य आणि वेळेत होतात. काही वेळेला डॉक्टरी सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया आणि आधुनिक तांत्रिक उपचार घेण्याची गरज भासूू शकते.

हृदय रोगापासून वाचण्यासाठी महिलांनी जीवनशैलीत बदल करणे, समतोल आहार घेणे, ताणतणावमुक्त राहणे आणि दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. पण, अनेक महिलांना हे शक्य होत नाही; परिणामी हृदयविकार बळावतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून घेण्याची गरज लागू शकते. त्यामध्ये अ‍ॅँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी केली जाते. अर्थातच ह्या सर्व शस्त्रक्रिया लक्षणे आणि शारीरिक क्षमता तपासूनच केल्या जातात. अँजियोप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांतील अडथळे कमी करून हृदयाला होणारा रक्तप्रवाह वाढवला जाता आणि एकूणच शरीरातील रक्तप्रवाहालाही गती मिळते.

बायपास शस्त्रक्रिया – या शस्त्रक्रियेमध्ये हृदयातील ब्लॉक्स म्हणजे गुठळ्या आणि संकुचित झालेल्या धमन्या काढून टाकल्या जातात. त्यामुळे हृदयाला होणार्‍या रक्तपुरवठ्याला अडथळा येत नाही. बायापास शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला हृदयविकाराशी लढण्यात खूप मदत मिळते. आधी म्हटल्यानुसार शस्त्रक्रिया टाळण्यासाठी आपण जीवनशैलीतील काही बदल अंगीकारणे आवश्यक ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news