

सातारा : हृदयविकार हा पुरुषांचा आजार असल्याचा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र, पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक असून बर्याचदा पुरुषांपेक्षा महिलांमधील लक्षणे वेगळी असल्याचे दिसते. 25 ते 35 वयोगटातील 15 टक्के महिलांना हृदयविकाराचा त्रास जाणवत असून केवळ 46 टक्के महिलांना हृदयविकाराच्या आजाराचे गांभीर्य आहे. स्त्रियांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचा धोका हा स्तनांच्या कर्करोगामुळे येणार्या मृत्यूच्या धोक्याहूनही अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ञांच्या अभ्यासात समोर आले आहे. (Heart Attack)
हृदयरोग ही गेल्या काही वर्षांतील वाढलेली आरोग्य समस्या आहे. हृदयावर विविध कारणांनी येणारा ताण, रक्तवाहिन्यांमध्ये होणारे ब्लॉकेजेस, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव ही आपल्याला माहीत असलेली काही सामान्य कारणे आहेत; पण पुरुषांमध्ये या समस्येचा होणारा त्रास आणि स्त्रियांमध्ये होणारा त्रास यामध्ये बराच फरक असल्याचे दिसते. नुकताच हृदयरोगाविषयी एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये भारतासह 50 देशांचा समावेश करण्यात आला होता. जवळपास 15 अभ्यासांच्या विश्लेषणानुसार हृदयविकाराच्या समस्यांचे निदान आणि उपचार करताना स्त्रियांना त्याचा जास्त प्रमाणात त्रास भोगावा लागतो. महिलांना छातीतील वेदना पुरुषांपेक्षा काही प्रमाणात जास्त होतात.
आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्क्युलर बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात याबद्दलची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. हृदयविकार असलेल्या महिलांमध्ये उलट्या होणे, जॉईंट पेन आणि पोटात दुखणे या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे दिसते. अनेकदा महिलांना हृदयाच्या तक्रारींमुळे छातीतही वेदना होतात. तरुण वयात म्हणजेच वयाच्या 35 ते 51 वर्षे वयात हार्ट अॅटॅक येणार्या तरुणींच्या संख्येत गेल्या काही वर्षांत साधारण 25 ते 30 टक्के वाढ झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. प्रेगन्सीमध्ये होणार्या हार्टअॅटॅक किंवा हार्टशी निगडीत समस्यांमध्येही वेगावे वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. (Heart Attack)
महिलांना सतत असणारे ताणतणाव हेही हृदयरोगाचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. महिलांमध्ये असणारे हार्मोन्स पुरुषांपेक्षा वेगळे असल्याने कदाचित त्यांना हृदयरोगाचा जास्त त्रास होत असावा असा अंदाज काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी महिलांनी हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. सतत तणावाखाली न राहणे, नियमित व्यायाम आणि उत्तम आहार घेणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. हृदयविकाराची स्त्रियांना जाणवणारी लक्षणे ही बर्याचदा पुरुषांपेक्षा वेगळी असतात आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
दिवसभरातून किमान अर्ध्या तासासाठी मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा. सकस आहार घ्या. हृदयाच्या द़ृष्टीने चांगल्या आहारामध्ये फळे आणि भाज्या, अखंड धान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश असतो. त्याचबरोबर सोडियमचे सेवन कमी करा आणि ज्यांच्यामुळे ट्रान्स फॅटस् शरीरात जातील असे पदार्थ खाणे टाळा. धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुपटीने वाढते, तेव्हा सिगारेटला तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा. मनावरील ताण कमी करा, दीर्घकाळापासून मनावर असलेला ताण तसेच नैराश्य यांच्यामुळे हृदयविकाराचा झटका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी बोला. ध्यानधारणा आणि योगासनांचा वापर करा, पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
बैठ्या जीवनशलीचा अंगिकार कुटुंबामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा पूर्वेतिहास असणे हे आजही पहिल्या क्रमांकाचे कारण आहे. ताणतणाव धूम्रपान घरात आणि बाहेरही आढळणारे वायू प्रदूषण हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी उपाय अधिक सक्रिय राहणे गरजेचे आहे. (Heart Attack)