

आपल्या देशात महिलांच्या आरोग्याबाबत फारशी सजगता दाखविली जात नाही. विशेषत: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांनी काही असाध्य आजारांपासून बचाव करण्यासाठी अधिक सजगता बाळगणे गरजेचे आहे. ब-ेस्ट कॅन्सर, आर्थरायटिस, गर्भाशयाशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, आस्टियोपोरोसिस आदी. त्यामुळे प्रत्येक महिलेसाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.
कोरोना काळात आरेाग्य विम्याचे महत्त्व सर्वांना कळून चुकले आहे आणि हे आता सांगण्याची गरज नाही. गंभीर आजारावर उपचार करता करता जमलेले भांडवल कधी संपते याचा थांगपत्ताही लागत नाही. अनेकदा तर कर्जही घ्यावे लागते. महिलांसाठींचा विशेष आरोग्य विमा हा महिलांना सर्व प्रकारच्या आजारापासून कवच देण्याचे काम करतो.
* आरोग्य विमा योजना : विमा कंपन्यांनी महिलांसाठी अनेक कस्टमाईज्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन बाजारात आणले आहेत. त्याची निवड करताना अनेकांचा गोंधळ उडू शकतो. अर्थात, या योजना महिलांचे विशिष्ट आजार आणि आरोग्याचा विचार करूनच तयार केल्या आहेत. या योजना खरेदी करताना महिलांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपल्यासाठी कोणती योजना उपयुक्त आहे, हे पाहावे लागेल. साधारणपणे आरोग्य विमा उतरवताना हप्ता, कालावधी, करबचत आणि लाभाचे आकलन केले जाते. परंतु, महिलांनी याशिवाय आणखी काही गोष्टींचादेखील विचार करायला हवा.
* योजनेचा प्रकार : हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना आपल्यासाठी विशेष योजना आहे की नाही, हे महिलांनी पाहावे. सामान्य आरोग्य विम्यात महिलांना विविध आजारांचे कवच मिळत नाही. परिणामी, त्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. बाळंतपण, आरोग्याची काळजी, मातृत्व कवच यासारख्या आरेाग्य लाभासह फॅमिली फ्लोटर प्लॅनची निवड करणे उपयुक्त राहते.
* सर्व प्रकारचे कवच असावे : बहुतांश आरोग्य विम्यात अगोदरपासून असलेल्या आजारांना कवच दिले जात नाही. म्हणून गरजेनुसार प्रत्येक आजारांचा आरोग्य विम्यात समावेश करायला हवा. सध्या असलेला आजार आणि भविष्यातील संभाव्य आजार यांना कवच देणार्या योजनांचा शोध घ्यायला हवा.
* वंध्यत्वाची समस्या : महिलांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात झगडावे लागते. लैंगिक असमानतेचा देखील सामना करावा लागतो. अशावेळी महिलांच्या आरोग्यावर परिणाम होणे साहजिकच आहे. महिलांत नैराश्य वाढते, तसेच वंध्यत्वाचे प्रमाणही वाढू शकते. आरोग्य विमा निवडताना या गोष्टींचा विचार करायला हवा. यारितीने बाळंतपण आणि वंध्यत्वाशी संबंधित आजाराशी मुकाबला करणे शक्य होईल.
* नेटवर्कमधील रुग्णालये : आजारपण सांगून येत नाही. अचानक उद्भवलेल्या कोणत्याही आजाराचा मुकाबला करण्यासाठी पॉलिसी असण्याबरोबरच पॉलिसीचे नेटवर्क असलेले रुग्णालय आपल्या परिसरात आहे की नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नेटवर्कमधील रुग्णालयात गंभीर आजारावर उपचाराची सोय आहे की नाही, हे देखील पाहावे.
* वेटिंग पीरियड आणि अॅड ऑन कवच : आजच्या घडीला पंधरा वर्षांची मुलगी थॉयराईडशी पीडित असून अन्य हार्मोनल आजारपणालादेखील बळी पडत आहेत. बहुतांश हेल्थ इन्शुरन्स प्लॅन हे अगोदरपासून असलेल्या आजारासाठी दोन ते पाच वर्षांचा वेटिंग पीरियड देतात. अशावेळी वेटिंग पीरियडची माहिती कंपनीकडून मिळवायला हवी. तसेच महिलांसाठीच्या विमा पॉलिसीत अन्य लाभांशिवाय काही विमा कंपन्या वर्षातून एकदा मोफत उपचार आणि अॅड ऑन कवचदेखील देतात. या सुविधा महिलांसाठी फायद्याच्या आहेत.
* स्तनाच्या कर्करोगापासून कवच गरजेचे : प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्य विमा पॉलिसीत ब-ेस्ट कॅन्सरला विमा कवच प्रदान करणे गरजेचे आहे. तसेच गर्भाशयाशी संबंधित आजारांना कवच घेतले, तरी तो निर्णय चांगला ठरू शकतो. कारण, महिलांत गर्भाशय तसेच स्तनच्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.
* आरोग्य विम्यातील महत्त्वाचे घटक : महिलांसाठी उपयुक्त आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी काही गोष्टींचे आकलन करायला हवे. महिलांमध्ये काही गंभीर आजार हे जीवघेणे राहू शकतात. त्यात स्तनाचा कर्करोग, डिम्बग्रंथी अल्सर तसेच अन्य आजारांचा धोकादेखील राहू शकतो. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पॉलिसी खरेदी करावी.
* कशी असावी पॉलिसी? : महिलांनी देशाच्या सर्वांगीण विकासात मोलाची कामगिरी बजावली आहे. महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा हा कळीचा मुद्दा असून सरकारचे या मुद्द्याकडे नेहमीच लक्ष राहिलेले आहे. महिलांसाठी आरोग्य विमा महत्त्वाचा असून मानसिक शांतता प्रदान करण्याबरोबरच आर्थिक स्थिती राखण्यासाठी मदत करतो. आरोग्य विमा कोणताही असो, फॅमिली फ्लोटर किंवा वैयक्तिक, पण आरोग्य विमा उतरवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
* उपयुक्त पॉलिसी कशी निवडावी? : देशातील अनेक विमा कंपन्यांनी महिलांसाठी विशेष आरोग्य विमा योजना आणल्या असून त्या जवळपास सर्वच आजारांना कवच देत आहेत. पॉलिसी खरेदी करताना हप्ता, कालावधी, शुल्क या गोष्टींचा विचार करावाच. रुग्णालयात भरती झाल्यानंतर मिळणार्या आरोग्य सुविधांचे आकलन करायला हवे. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर यासारख्या आरोग्य विमा प्लॅनमधील फरक जाणून घ्यायला हवा आणि सोयीनुसार आरोग्य विम्याची निवड करायला हवी.
सुचित्रा दिवाकर