राजनाथ सिंह यांची हॅट्ट्रिक निश्चित

राजनाथ सिंह
राजनाथ सिंह
Published on
Updated on

गोमती नदीच्या तीरावर वसलेले देशातील कला व संस्कृतीचे माहेरघर आणि पौराणिक काळात प्रभू श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांच्या नावाने लखनपासी शहर असा उल्लेख सापडणार्‍या नवाबांचे शहर म्हणून ख्यातीप्राप्त लखनौ लोकसभा मतदार संघात भाजपचे ज्येष्ठ नेते व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेस-सप इंडिया आघाडीचे रवीदास मेहरोत्रा यांनी आव्हान उभे केले आहे. मात्र, राजनाथ सिंह यांच्यासाठी भाजपचा गड राखणे फारसे कठीण नसल्याचे दिसून आले आहे.

लखनौमध्ये पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपकडून लखनौचा गड ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस- सप आघाडीने प्रचाराची राळ उडवून दिली आहे. लखनौ मतदार संघावर 1991 पासून म्हणजे, गेली 33 वर्षे भाजपचा ताबा आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या मतदार संघातून तब्बल आठ वेळा निवडणूक लढविली होती. सुरुवातीच्या काळात 1955, 1957 आणि 1962 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर 1991 पासून 2004 पर्यंतच्या सलग पाच निवडणुकांमध्ये विजयी होऊन वाजपेयी यांनी देशाचे नेतृत्व केले. लखनौ ही वाजपेयी यांची कर्मभूमी आहे.

काँग्रेस पक्षाने 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लखनौची जागा जिंकली होती. शिवराजवती नेहरू यांना लखनौच्या पहिल्या खासदार होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यांनतरच्या सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून काँग्रेसने आपला गड कायम राखला होता. 1971 मध्ये काँग्रेसच्या शीला कौल लखनौच्या खासदार होत्या. मात्र, त्यांनतर काँग्रेसला लखनौवर ताबा मिळविता आला नाही.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 2014 पासून या मतदार संघात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या रिता बहुगुणा जोशी यांचा तब्बल 2 लाख 88 हजार 357 मतांनी पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने राजनाथ सिंह यांच्याविरोधात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांना तिकीट दिले होते. मात्र, राजनाथ सिंह यांनी त्यांचा तब्बल 3 लाख 47 हजार 302 इतक्या विक्रमी मतांनी पराभव करून आपला गड राखला होता.

लखनौ मतदार संघात ब्राह्मण आणि वैश्य समाजाची निर्णायक मते आहेत. मुस्लिमांची संख्या 21 टक्के, तर त्याखालोखाल इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. या मतदार संघात निवडून येण्यासाठी जातीय समीकरणे महत्त्वपूर्ण आहेत.
यंदा राजनाथ सिंह यांच्याविरोधात काँग्रेस-सप आघाडीने रवीदास मेहरोत्रा यांना उमेदवारी दिली आहे. राजनाथ सिंह यांना तिसर्‍यांदा विजयी होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस-सपने जोरदार प्रचार अभियान राबविले आहे. तरीही राजनाथ सिंह आपला गड कायम राखतील, असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news