

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. तिने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. हरमन आता सर्वाधिक टी-20 क्रिकेट सामने खेळणारी क्रिकेटर बनली आहे. या प्रकरणात आता रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
शनिवारी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या 'ग्रुप बी'मधील सामन्यात हरमनने (Harmanpreet Kaur) इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना तिने 149 वा सामना खेळला. रोहितने टी-20 चे 148 सामने खेळले आहेत. या यादीत तिस-या क्रमांकावर न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स आहे. तिने आतापर्यंत 140 टी-20 सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरीने टी-20 विश्वचषकातील सामन्यांच्या बाबतीत रोहित शर्माचा विक्रम मोडला. आता ती टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. रोहितने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 39 सामने खेळले आहेत, तर 18 फेब्रुवारी रोजी एलिस पेरीने तिचा 40 वा टी-20 विश्वचषक सामना खेळला.