मांगल्यदायी, आनंददायी दीपोत्सव!

मांगल्यदायी, आनंददायी दीपोत्सव!
Published on
Updated on

दिवाळी हा सण भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो. हा सण शरद ऋतूच्या मध्यभागी येत असतो. या काळात नव्या धान्याची पिके तयार होऊन काढणी आणि इतर कामे होऊन, नवीन धान्य घरात येण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वत्र आनंद असतो आणि या आनंदाचा उत्सव म्हणजेच दीपावली!

लक्ष-लक्ष दिव्यांनी अवघा आसमंत उजळणारी, प्रकाशमान करणारी दिवाळी संपूर्ण भारतवर्षात आनंदाने, उत्साहाने साजरी केली जाते. धर्मग्रंथांमध्येही दिवाळीविषयी अनेक संदर्भ, परंपरा यांचा उल्लेख आहे. काही ग्रंथकारांच्या मते, दिवाळी ही तीन दिवसांची असते, तर काही ग्रंथकार केवळ प्रतिपदा आणि अमावस्या हे दोनच दिवस दिवाळी असल्याचे सांगतात. धर्मशास्त्रामध्ये अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धनत्रयोदशी हा दिवस दिवाळीच्या सणाला जोडून येतो; पण दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशीची गणना होत नाही. धनत्रयोदशीच्या तिथीला दीर्घायुष्यासाठी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करण्यास सांगितले गेले आहे. दीपदानामुळे माणसाला अपमृत्यू येणार नाही, असे सांगितले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे हे सर्व स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. तसेच या दिवशी कुबेर, लक्ष्मी आणि विष्णू यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे. याच दिवशी आयुर्वेदाचे प्रवर्तक श्री धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते. रुढार्थाने दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्थी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16 सहस्र नारींची मुक्तता केली. त्यामुळे हा दिवस आनंंदाने घालवावा, असा एक त्यातला भाग आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करावे आणि तेही अरुणोदयापूर्वी करावे असे शास्त्रात सांगितले आहे.

अभ्यंगस्नानानंतर या दिवशी फराळ करण्याची प्रथा आहे. यामध्ये प्रामुख्याने तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात असतात. याचे कारण पुढे येणार्‍या थंडीच्या काळासाठीची ऊर्जा त्यातून मिळावी, असे अपेक्षित आहे. दिवाळीचा फराळ हा एकट्याने वा कुटुंबानेच घ्यावयाचा असे अभिप्रेत नाही, तर समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला हा आनंद आपण दिला पाहिजे. समाजातील समानता टिकून राहावी, अशा भावनेने फराळाचे आदान-प्रदान हे या दिवसांत होत असते. नरक चतुर्थी दिवशी अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाची 14 तर्पणे करायला सांगितली आहेत. तर्पण केवळ पितरांसाठीच करायचे असते, असा अनेकांचा समज आहे; पण देवांसाठीही तर्पण केले जाते. यम हा आद्य पितर आहे. यम, धर्म, मृत्यू, अंतक, वैवस्यत, काल, सर्वभूतक्षयकर, औदुंबर, नील, परमेश्वर, रूपदोर, चित्र आणि चित्रगुप्त आदी 14 नावांनी या दिवशी तर्पण करावयाचे असते. नरक चतुर्थी आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी ही तर्पणे करावीत. ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांनी पाण्यात तीळ घालून, ज्यांचे वडील हयात आहेत, त्यांनी पाण्यात अक्षता घालून तर्पण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. नरक चतुर्थीनंतर येणारा दिवस लक्ष्मीपूजनाचा. हा दिवस अमावास्येचा आहे. मुहूर्तशास्त्राने अमावास्येला वर्ज्य सांगितले आहे; पण धर्मशास्त्राप्रमाणे समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला, तो अमावास्येच्या दिवशी. दुसरी गोष्ट म्हणजे बळी राजाने सर्व देवांना कैद केले होते, त्यावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून सर्व देवांची सुटका केली. या बंदिवासात लक्ष्मीही होती आणि याच दिवशी तिचीही मुक्तता झाली. म्हणूनही या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते.

लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. इथेही प्रदोषकाळात बळीराजाची पूजा करायला सांगितली आहे. बळीराजा हा देवांचा राजा इंद्र आहे, असे धर्मशास्त्र सांगते. बळीराजा हा मुळात दैत्य कुळातला असला, तरी तो सुंदर राज्य करणारा होता. असुर कुळातील असला, तरी तो प्रल्हादाचा मुलगा असल्याने त्याच्यावर विष्णूभक्तीचे झालेले संस्कार होते. त्यामुळे तो विष्णूभक्तही होता आणि एक कुशल प्रशासकही होता. असूर कुळातील असूनही हा बळीराजा दानशूर होता. दानवी कुळाच्या दोषामुळे त्याने सर्व देवांसहीत लक्ष्मीलाही त्यांने बंदिवान बनवले. त्यावेळी सर्व देवांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला. ते बटू बनून! बळीराजाच्या यज्ञाच्या ठिकाणी दान मागायला गेले. असुरांचे गुरू शुक्राचार्य यांनी बळीराजाला हे दान देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. कारण, त्यांनी बटूच्या अवतारात आलेल्या भगवान विष्णूंना ओळखले होते; मात्र विष्णूने दानासाठी मागितलेली तीन पावले जागा देण्यास बळीराजाने सहमती दर्शवली. या तीन पावलांत भगवान विष्णूंनी दोन पावलांत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली आणि तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पातळात धाडले.

बलिप्रतिप्रदेच्या दिवशी घरातील सवाष्ण स्त्री पतीला ओवाळत असते. याला दिवाळी पाडवा असे म्हणतो. याच दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाने इंद्राच्या कोपापासून गावकर्‍यांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलून सर्वांना अभय दिले, याची आठवण म्हणून या दिवशी घरात पर्वताची प्रतिकृती तयार करून त्याची प्रतिकात्मक पूजा केली जाते. भगवंताने केलेल्या या पराक्रमाबद्दल त्याला वेगवेगळ्या पदार्थांचा अन्नकूट बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. बलिप्रतिप्रदेच्या दुसर्‍या दिवशी भाऊबीज येते. याला यमद्वितीयाही म्हटलेले आहे. या दिवशी यमराज बहीण यमीच्या घरी भोजनाला गेले. म्हणून या दिवशी प्रत्येक भावाने या दिवशी बहिणीच्या हातचे भोजन करावे आणि तिचा सत्कार करावा, भेटवस्तू द्याव्यात, असे शास्त्र सांगते. ज्याला सख्खी बहीण नसेल त्यांनी अन्य बहिणीच्या हातचे भोजन करावे, असे सांगितलेले आहे. महाराष्ट्रातील किंवा भारतातील हवामान, पर्जन्यमानााच्या द़ृष्टिकोनातून आपल्याकडील बहुतांश पिके तयार झालेली असतात. संस्कृतमध्ये भाताला अन्न ही उपाधी दिलेली आहे. हे भाताचे पीक दिवाळीच्या आसपास पूर्ण तयार होते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीही आपल्याला अग्रायणी करायला सांगितलेली आहे. त्यामुळेच कोजागरीला नवान्न पौर्णिमाही म्हटले जाते. या दिवशी नव्या धान्याचे पदार्थ केले जातात. या पौर्णिमेपासून सुगीचे दिवस सुरू होतात. नव्या धान्याची पिके तयार होऊन काढणी आणि इतर कामे होऊन, नवीन धान्य घरात येण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे आनंद असतो आणि या आनंदाचा उत्सव म्हणजेच दिवाळी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news