

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे परप्रांतीय गुऱ्हाळ चालक जवळापास १५ लाखाचा चुना मूळ गुऱ्हाळ मालकासह परिसरातील शेतकऱ्यांना लावून पसार झाला आहे. तोंडावर आलेल्या दीपावलीच्या सणाला हा आर्थिक फटका बसल्याने या सर्वांना शिमग्याचीच आठवण झाली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की पिंपळगावचे शेतकरी संपत मुकींदा मापरे यांनी शेतात गुऱ्हाळ टाकले आहे. त्यांनी उत्तराखंड परिसरातील लेव्ह बोली भागात राहणारे दीपक कश्यप आणि विकास कश्यप यांना ते गुऱ्हाळ चालवण्यासाठी दिले होते.
परिवारासह या दोघांनी परिसरात मर्जी संभाळून काही महिने उत्तम रित्या गुऱ्हाळ चालवले. ऊस विकत घेणे आणि गुळ निर्माण करून त्यांनी उत्तम व्यापार करत परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला त्यांचा उत्तम कारभार व विश्वासामुळे शेतकऱ्यांनी त्यांना ऊस उधारीवर देण्यास सुरुवात केली, त्यात मूळ मालक मापरे यांचा सुद्धा सहभाग होता त्यांना या कश्यपांनी साडेपाच लाख रुपयाला चुना लावला आणि आक्टोंबर महिन्याच्या पहिल्याच रात्री कुटुंबासह पलायन केले आहे.
जाताना त्यांनी परिसरातील आण्णा कापरे,शंकर रानवडे. महेश नातू ,दादा टेळे, दत्ता नवले यांच्यासह किराणा दुकानदार यांनाही फसविले आहे. दौंड तालुक्यात गुऱ्हाळची संख्या प्रचंड मोठी आहे जवळापास एक हजाराहून अधिक संख्या असलेल्या गुऱ्हाळ मालकांनी जवळपास सर्वच ठिकाणी परप्रांतीयांना चालवण्यासाठी दिली आहेत. अनेक ठिकाणी या चालकांनी आर्थिक चुना लावून पलायन केले आहे. दापोडी ,केडगाव हंडाळवाडी परिसरात असे प्रकारचे प्रसंग घडले आहेत. अजूनही ते प्रकार घडत असताना चालकांना आवरण्यासाठी मालकांना शहाणपण कधी येणार हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.