

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाची कर्णधार बेथ मुनी (Beth Mooney) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व स्नेह राणाकडे तर उपकर्णधार पदाची जबाबदारी ऍश गार्डनरकडे सोपवण्यात आली आहे.
डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन खेळाडू बेथ मुनीला (Beth Mooney) दुखापत झाली होती. दुखापत गंभार असल्याने ती डब्ल्यूपीएलच्या पुढील सामन्यांत खेळू शकणार नाही. चार ते सहा आठवड्यांत ती पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असे वैद्यकीय तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
गार्डनर ही डब्ल्यूपीएलमधील दुसरी सर्वात महागडी खेळाडू आहे. गुजताने 3.2 कोटी रुपये मोजून तिला आपल्या संघात सामील करून घेतले. पहिल्या 2 सामन्यात ती काही खास खेळी करू शकली नाही, मात्र बुधवारी झालेल्या सामन्यात तिने अष्टपैलू कामगिरी केली. गार्डनरने आरसीबी विरुद्ध 15 चेंडूत 19 धावा केल्या. याशिवाय 4 षटकात 31 धावा देऊन सर्वाधिक 3 बळी घेतले.
मूनी (Beth Mooney) म्हणाली की, 'मी गुजरात जायंट्ससोबत खेळण्याची वाट पाहत होती परंतु दुर्दैवाने दुखापतीमुळे या पुढे खेळाता येणार नाहीय. उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडल्यामुळे मी निराश आहे. पण संघाचे मनोबल वाढवण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करीन.'
गुजरात जायंट्सने मुनीची कमतरता भरून काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डचा संघात समावेश केला आहे. नुकत्याच झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर लॉराने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने विश्वचषकात खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली. यादरम्यान ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडूही होती. अशा स्थितीत लॉराचा संघात समावेश झाल्याचा फायदा गुजरात जायंट्सला होईल अशी अपेक्षा आहे.
गुजरात जायंट्सचा पुढील सामना 11 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने गुजरात संघासाठी स्पर्धेतील पुढील सर्व सामने अतिशय महत्त्वाचे आहेत. हा संघ सध्या तीन सामन्यांतून 2 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.