रहस्‍यरंजन : गिरनारच्या पायर्‍या

गिरनारच्या पायर्‍या
गिरनारच्या पायर्‍या
Published on
Updated on

ब्रिटिश अभियंत्याच्या देखरेखीखाली गिरनार पर्वतावर काम सुरू झाले. यासाठी एकूण 19 वर्षांचा कालावधी लागला. हे पायर्‍यानिर्मितीचे काम जितके अवघड, तितकेच आव्हानात्मक होते. उंचावर बांधकामाचे साहित्य नेणे, मजुरांची दमछाक आणि ऊन, वारा, पाऊस सहन करत अगदी पायर्‍यांची व्यवस्थित बांधणी करणे हेदेखील एक आव्हानच होते.

जुनागडची गोष्ट समोर येते, तेव्हा गिरनार पर्वत नक्की डोळ्यांसमोर येतो. गिरनार सर्वांसाठी आस्थेचे प्रतीक आहे. गिरनारच्या 10 हजार पायर्‍या चढून जायच्या म्हणजे प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी लागते. कारण, गिरनार खरोखरच भव्य आहे, दिव्य आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त गिरनारवर चढून जातात. गिरनारच्या पायर्‍या खरंच खूप अवघड आहेत, एवढे अवघड बांधकाम कोणी आणि कसे केले असेल, पायर्‍या कोणी आणि कशा तयार केल्या असतील, हे जाणून घेणं रंजकच आहे.

गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ 5 कि.मी. अंतरावर आहे. तिथून सुरू होतो गिरनारचा उंच पर्वत. पर्वतावर श्रीदत्तात्रेय मंदिर आहे. येथे हिंदू धर्माचीच नव्हे, तर जैन धर्माचीही अनेक मंदिरे आहेत. गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशीही सापडतात. सम्राट अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनीही त्याचा उल्लेख केला आहे.

येथे इसवी सन पूर्व 250 मधील सम्राट अशोककालीन शिलालेख आहे. इ.स. 150 च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. 'रा' खेंगार आणि चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेषही गिरनारवर सापडतात.

पाच हजार पायर्‍या चढल्यानंतर तेथे अंबामातेचे एक मंदिर आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पवर्तावर वास केला म्हणून हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याच्यापुढे पाचशे पायर्‍या चढल्या की, श्रीगोरक्षनाथांचे मंदिर आहे. पुढे पंधराशे पायर्‍या संपल्या की, भैरवनाथाचे मंदिर आहे. 300 पायर्‍या उतरून गेल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे 1000 पायर्‍या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच ठिकाणी गुरू श्रीदत्तात्रेयांनी 12 हजार वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. 2,250 पायर्‍यांनंतर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा लागते. येथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता अशी लहान लहान मंदिरे आहेत.

बाजूला जैन तीर्थंकर नेमिनाथांचे जैन मंदिर आहे. नवनाथांसह अनेक मंदिरे येथे आढळतात. इतक्या पायर्‍या चढून जाणे ही एक सत्त्वपरीक्षाच आहे. शिवाय, हिंदू आणि जैन धर्मीयांची एकत्र मंदिरे असणे हे या गिरनार पवर्ताचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांची यात्रा भरते.

जुनागडपासून गिरनारला जाण्यास अनेक वाहने आणि वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. तसेच रोप वेदेखील आहे; पण भक्त पायर्‍या चढून जातात. गिरनारच्या निर्मिती आणि त्याच्या पायर्‍यांशी संबंधित एक महान इतिहास जोडला गेला आहे.

गिरनार हा गुजरातमधील सर्वात उंच पर्वत आहे. लोक तेथे वषर्भर तीर्थयात्रा करण्यासाठी येतात. देवदिवाळीच्या वेळी लोक पायी परिक्रमेचा आनंददेखील घ्यायला येतात. जुनागड आणि गिरनार पर्वताचा इतिहास अचंबित करणारा आहे.

या इतिहासाबाबत असं सांगितलं जातं की, 1857 च्या क्रांतीला 32 वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण भारत काबीज केला होता आणि अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात आली होती. जुनागड हेही गुजरातमधील एक संस्थान होते. या संस्थानाचा नबाब बहादूर खान होता. यावेळी जुनागडच्या नवाबाचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई आणि नवाबाचे स्वीय सहायक पुरुषोत्तमराज झाला यांनी एक दिवस मिळून नबाबासमोर एक मत मांडले. ते म्हणाले की, हिंदू आणि जैन बांधवांना गिरनारवर जाणे खूप कठीण जाते. अनेक भक्त तर मृत्युमुखी पडतात. आपण पायर्‍या बांधून वाट निर्माण केली तर? वर जाण्यासाठी पायर्‍या बनवण्याची विनंती त्यांनी नबाबाकडे केली.

नबाबाने एका ब्रिटिश अभियंत्याला अहमदाबादहून येण्याचं आमंत्रण दिलं. त्याने निरीक्षण करून सांगितलं की, गिरनारच्या टोकाला पोहोचण्यापर्यंतचा पायर्‍यांचा एकूण खर्च एक लाख तीस हजार रुपये येईल.

1889 मध्ये 1 लाख 30 हजार रुपये ही मोठी रक्कम ऐकून नबाबाला धक्का बसला आणि त्याने नकार दिला. तेव्हा हरिदास देसाई आणि पुरुषोत्तमराज झाला म्हणाले की, नबाबसाहेब, सरकारी तिजोरीतून पैसे देऊ नका, आम्ही लॉटरीचे तिकीट काढू. लॉटरीमध्ये आकर्षक बक्षिसे असतील. आम्ही त्या लॉटरीची किंमत एक रुपया ठेवतो. म्हणजे लोक लॉटरी खरेदी करतील. त्याच पैशांतून आम्ही ही पायर्‍यांची निर्मिती करू. ही लॉटरी कोणत्या उद्देशाने काढत आहोत, हे आम्ही जाहीर करू. जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू आणि जैन लोक ही लॉटरी खरेदी करतीत. देसाई यांचे म्हणणे ऐकून नबाबाने या गोष्टीला संमती दिली.

त्यानंतर या कामासाठी 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. बेचारदास बिहारी दास हे या समितीचे प्रमुख होते. 1 ऑक्टोबर, 1889 रोजी एक रुपयाची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीच्या पहिल्या बक्षिसाची रक्कम 40 हजार होती. नंतर ती दहा हजार करण्यात आली. सर्वात कमी बक्षीस 5 रुपयांचे होते. त्यानंतर या लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आणि त्यात संपूर्ण योजना लिहिली गेली. या लॉटरीच्या तिकिटाच्या उत्पन्नातून पायर्‍या निर्माण होतील, असे वर लिहिले गेले. हिंदू आणि जैन भाविकांना गिरनार पर्वतावर जाण्यासाठी पायर्‍या बांधल्या जातील, असा मजकूर त्यात होता.

तिकिटामध्ये एक अतिशय आकर्षक योजना ठेवण्यात आली होती, जसे की, 12 तिकिटे एकत्र खरेदी केली तर एक तिकीट मोफत, 100 तिकिटे विकणार्‍याला 15 टक्के कमिशन मिळेल. जर तिकिटांची विक्री नाही झाली तर तुम्ही तिकिटे परत देऊ शकता. त्यानंतर अनेकांनी लॉटरी खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ब्रिटिशांनीही लॉटरीची तिकिटे खरेदी केली.

15 मे, 1892 रोजीचा तो दिवस उजाडला. लॉटरीचे बक्षीस काढण्याचे ठरले. हजारो लोक जुनागडला पोहोचले. जुनागड येथील फराज खान यांच्या घरी लॉटरीचे तिकीट ठेवण्यात आले होते. तब्बल 1,28,663 तिकिटे विकली गेली. पहिले 10 हजार रुपयांचे बक्षीस मुंबईच्या रहिवासी सविताबेन दह्याभाई खांडवाला यांना देण्यात आले. त्यांनी गिरनारच्या पायर्‍या बांधण्यासाठी हे दहा हजार रुपयांचे बक्षीस अर्पण केले.

1892 मध्ये, दहा हजार म्हणजे आजची कोट्यवधीमध्ये रक्कम असेल. दोन लोकांना दोन हजार पाचशे रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले. पंजाबमधील खुदा बक्श आणि लालचंद यांना ते मिळाले. नवसारीच्या बळवंतराय यांना तिसरे बक्षीस दीड हजार रुपयांचे मिळाले होते. अशाप्रकारे लॉटरी विकून जवळपास 1 लाख तीस रुपये जमा झाले.

ब्रिटिश अभियंत्याच्या देखरेखीखाली गिरनार पर्वतावर काम सुरू झाले. यासाठी एकूण 19 वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. 19 वर्षांचा कालावधी म्हणजे मोठा काळ आहे. हे पायर्‍यानिर्मितीचे काम जितके अवघड, तितकेच रहस्यमयदेखील आहे. इतक्या उंचावर बांधकामाचे साहित्य नेणे, मजुरांची दमछाक आणि ऊन, वारा, पाऊस सहन करत अगदी पायर्‍यांची व्यवस्थित बांधणी करणे हेदेखील एक आव्हानच होते.

ऋतुपर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news