कॉ. पानसरे दाम्पत्याचे रक्ताळलेले कपडे साक्षीदारांनी कोर्टात ओळखले

कॉ. पानसरे दाम्पत्याचे रक्ताळलेले कपडे साक्षीदारांनी कोर्टात ओळखले
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कॉ. गोविंद पानसरे खून खटल्याच्या मंगळवारपासून सुरू झालेल्या सुनावणीत दोन साक्षीदारांनी पानसरे दाम्पत्याचे रक्ताळलेले कपडे ओळखले. जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी येत्या 3 एप्रिलला होणार आहे.

मुख्य संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडेसह सर्वच संशयितांना बंगळूर व पुणे येथील कारागृहांतून पोलिस बंदोबस्तात दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

प्रथमच दुभाषकाची उपस्थिती

खटल्यातील प्रमुख साक्षीदारांसह पानसरे कुटुंबीय तसेच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. सुनावणीवेळी न्यायालयात खचाखच गर्दी झाली होती. संशयितांपैकी गणेश मिस्कीन व अनिल बद्दी मूळचे कर्नाटकातील आहेत. त्यांना भाषेची अडचण असल्याने दुभाषकाच्या उपस्थितीत खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली.

पंच इम्तियाज नूरमहम्मद हकीम (वय 47, रा. कसबा बावडा) व सादिक सिराज मुल्ला (38, रा. सिरत मोहल्ला, जवाहरनगर) यांची साक्ष झाली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी घेतलेल्या सरतपासात पंच इम्तियाज हकिम यांनी 16 फेब—ुवारी 2015 रोजी दुपारी 2.45 वाजता मोपेडवरून अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमार्गे सरनाईक वसाहत येथील भावाकडे जात असताना पोलिसांनी आपणाला तिथे थांबविले.

पंच म्हणून स्वत:हून तयारी

गोविंद पानसरे यांच्यासह पत्नी उमा यांच्यावरही गोळीबार झाला आहे. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सरकारमार्फत आपण पंच होऊ शकाल का? असा प्रश्न केला. त्यावर आपण होकार दिला. तपासकामी पंच म्हणून सहाय्य करण्याची तयारी असल्याचे आपण स्वत: सांगितले.

कॉ. पानसरे यांच्या अंगावरील कपडे आपणास डॉक्टर व पोलिस अधिकारी कांबळे यांनी दाखविले. ते मारेकर्‍यांच्या गोळीबारात रक्ताने माखल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यासमोर पंचनामा करून पोलिसांनी ते ताब्यात घेतल्याचे पंच हकीम यांनी सांगितले.

शर्ट व लुंगीवरही गोळीबारामुळे छिद्रे

त्यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निंबाळकर, अ‍ॅड. राणे यांनी संबंधित कपडे कोर्टात ओळखता का? असे विचारले. तेव्हा होय, असे उत्तर हकीम यांनी दिले. रक्ताचे डाग असलेले बनियन, पांढरा शर्ट, त्यावर गोळ्यांमुळे पडलेली दोन छिद्रे, लुंगीही रक्ताळलेली त्यावरही एक छिद्र पडल्याचे हकीम म्हणाले. खिशात लाल रंगाची डायरी, तोंडातील कवळीही त्यांनी ओळखली.

बचाव पक्षाचे म्हणणे फेटाळले!

बचाव पक्षामार्फत अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी हकीम यांचा उलटतपास घेतला. सरकारी पक्षाला मदत करण्यासाठी कोर्टात खोटी साक्ष देत असल्याचे सांगताच हकीम यांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावले.

आपल्यासमोरच पंचनामा : मुल्ला

मारेकर्‍यांनी केलेल्या गोळीबारात उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आपल्यासमोर उमा पानसरे यांचे रक्ताळलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेऊन सीलबंद केल्याचे पंच मुल्ला यांनी जबाबात सांगितले. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. इचलकरंजीकर व अ‍ॅड. खेमलापुरे यांच्या बचावाच्या मुद्द्याचे त्यांनी खंडण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news