

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आरोपी न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने सोमवारी खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. येत्या 21 मार्चला सुनावणी होणार आहे. दोन आरोपींना भाषेची अडचण असल्याने त्यांच्यासाठी दुभाषिक म्हणून अॅड. एन. जी. कुलकर्णी यांची सरकार व बचाव पक्षाच्या सहमतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश (3) एस.एस. तांबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. खटल्यात आज चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येणार होत्या. मात्र, ज्येष्ठ साहित्यिका गौरी लंकेश हत्येप्रकरणी बंगळूर न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कॉ. पानसरे हत्येतील आरोपी सुनावणीसाठी येथील जिल्हा न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत.
बचाव पक्षामार्फत अॅड. समीर पटवर्धन यांनी हरकत घेत आरोपींच्या अनुपस्थित साक्षीदारांचा जबाब नोदविणे अयोग्य ठरेल, असा युक्तिवाद केला. त्यावर विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. शिवाजीराव राणे यांनी हरकत घेतली.
आरोपींना हजर ठेवण्याचे निर्देश
कॉ. पानसरे व गौरी लंकेश यांच्या हत्येत याच आरोपींचा समावेश असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. मात्र अॅड. पटवर्धन भूमिकेवर ठाम राहिले. 21 मार्चला होणार्या खटला सुनावणीसाठी आरोपींना न्यायालयात उपस्थित ठेवण्याचे निर्देश तपास अधिकार्यांना देण्यात आले.
दुभाषिक नियुक्ती सहमतीने
खटल्यातील दोन आरोपी गणेश मिस्किन व अमित बद्दा मुळचे कर्नाटकातील आहेत. त्यामुळे त्यांना भाषेची अडचण आहे. त्यांच्यासाठी दुभाषिक ठेवण्याची लेखी मागणी अॅड. पटवर्धन यांनी न्यायाधिशांकडे केली. अॅड. एन.जी. कुलकर्णी यांचे नाव त्यांनी सुचविले. विशेष सरकारी वकिल अॅड. निंबाळकर व अॅड. राणे यांच्या सहमतीने दुभाषिक म्हणून अॅड. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला.
साक्षीदारांची कोर्टात उपस्थिती
पत्रकारांशी बोलताना विशेष सरकारी वकिल अॅड. हर्षद निंबाळकर म्हणाले, खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयाने समन्स बजावलेले चारही साक्षीदार न्यायालयात उपस्थित होते. त्यांना दि. 21 रोजी होणार्या सुनावणीसाठी बोलाविण्यात येईल.
वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी 'व्हीसी' पर्याय
हत्येतील आरोपी पुणे व बंगळूर येथील कारागृहात बंदिस्त असल्याने प्रवासासाठी किमान दहा ते बारा तासाचा अवधी लागतो. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी व्हीसीद्वारेही त्यांच्याशी संपर्क साधला जावू शकतो, याबाबत न्यायाधिशांना विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. खटल्याच्या सुनावणीवेळी प्रा.मेघा पानसरे, कॉ. दिलीप पोवार,सतिशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.