हात नसतानाही मिळाले ड्रायव्हिंग लायसेन्स!

हात नसतानाही मिळाले ड्रायव्हिंग लायसेन्स!
Published on
Updated on

तिरुवनंतपूरम : 'प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे' ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करून दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही या तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे हा परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी, असे स्वप्न होते. आपले हे स्वप्न तिने अखेर जिद्दीने पूर्ण केलं आहे.

केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आता ती चारचाकी वाहन चालवू शकते. कोच्ची येथे ग्राफिक आर्ट डिझायनर म्हणून काम करणारी 32 वर्षीय जिलुमोल मॅरिएट थॉमस मागील काही वर्षांपासून चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसेन्स मिळावे यासाठी प्रयत्न करत होती. यासाठी मागील बर्‍याच काळापासून ती वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेत होती. यादरम्यान कोच्चीमधील एक स्टार्ट-अप कंपनी वी इनोव्हेशनने तिच्या स्वप्नांना बळ दिलं. स्टार्ट-अपने विशेषतः मॅरियटच्या कारसाठी ऑपरेटिंग इंडिकेटर, वाइपर आणि हेडलॅम्पसाठी व्हॉइस कमांड-आधारित प्रणाली विकसित केली. या तंत्रज्ञानाच्या आणि प्रणालीच्या मदतीने मॅरियटला कार चालवण्यासाठी तिच्या हातांचा वापर करावा लागत नाही आणि ती काही निवडक वैशिष्ट्ये फक्त एका आवाजाने ऑपरेट करू शकणार आहे.

केरळच्या दिव्यांग आयोगानेही मॅरिएटला इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला. हात नसतानाही मॅरिएट कार कशी चालवत असेल, असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच. मॅरिएट कार चालवण्यासाठी पायांचा वापर करते. ती आपल्या पायांनीच स्टेअरिंग व्हिल सांभाळते आणि अत्यंत कुशलपणे कार चालवते. मॅरिएट सर्व कामं आपल्या पायांनीच करत असून, तिने स्वत:ला तसे तयार केले आहे. ती आपल्या पायाने स्वाक्षरीही करते. मॅरिएटने ड्रायव्हिंग लायसेन्स मिळविण्यासाठी, ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण केली आहे, त्यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार परवाना जारी करण्यात आला आहे. मॅरिएटने मोटार वाहन विभागाच्या कर्मचार्‍यांसमोर लेखी आणि 'एच' चाचणी यशस्वीपणे उत्तीर्ण केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news