सांगे, नेत्रावळी भागात व्याघ्र उद्यान विचाराधीन

सांगे, नेत्रावळी भागात व्याघ्र उद्यान विचाराधीन
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  सांगे किंवा नेत्रावळी भागात स्वतंत्र व्याघ्र उद्यान करण्यासाठी वन खाते प्रयत्नशील आहे. याबाबत केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. बोंडला अभयारण्यात योग्य सुविधा नसल्याने तेथे वाघ आणणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेली तीन वर्षे सुरू असलेल्या बोंडलात वाघ येणार, या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.

मंत्री राणे म्हणाले की, मी स्वतः वन्यजीवप्रेमी आहे. त्यामुळे मला बोंडला अभयारण्यात वाघ आणणे आवडले असते. मात्र, तेथे वाघांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा नाहीत. वाघांसाठी मोठी जागाही नाही. याऐवजी आम्ही सांगे किंवा नेत्रावळी भागात व्याघ्र उद्यान आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही जागा मोठी असेल, तेथे कुंपण घालून आतील भागात वाघ सोडले जातील. २००९ मध्ये बोंडला प्राणी संग्रहालयात विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी पार्कमधून 'राणा' आणि संध्या नावाच्या वाघांची जोडी आणण्यात आली होती. येथे भेट देणाऱ्या लोकांना आणि विशेषतः लहान मुलांना या वाघांचे खूप आकर्षण होते. २०१६ मध्ये राणाचा, तर २०१७ मध्ये संध्याचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. त्यानंतर येथे आजपर्यंत वाघ आणण्यात आलेला नाही.

सत्तरीत टँकर माफिया कार्यरत

राणे यांनी सांगितले की, सत्तरी तालुक्यात काही टँकर माफिया कार्यरत आहेत. ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत संधान बांधून कृत्रिम पाणीटंचाई करत आहेत. याबाबत आपण लवकरच मंत्री नीलेश काब्राल यांच्यासोबत चर्चा करणार आहे. याप्रकरणी चौकशी होणे आवश्यक आहे.

साट्रेतील आग आटोक्यात आणण्यास नौदलाचीही मदत घेणार

साट्रे येथे लागलेल्या आगीबाबत मंत्री राणे म्हणाले की, आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक सौरभ कुमार यांना सूचना दिल्या आहेत. या कामात गरज पडल्यास जिल्हाधिकारी तसेच नौदलाची मदत घेणार आहोत. घटनेचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news