

पणजी, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने आतापर्यंत 943 कोटी रुपये खर्चाच्या 70 प्रकल्पांचा डीपीआर तयार केला आहे. त्यातील 42 प्रकल्पांचे डीपीआर केंद्र सरकारला पाठवले आहेत. केंद्राने आत्तापर्यंत 272 कोटींचे डीपीआर मंजूर केले असून 'आझादी का अमृतकाल' योजनेंतर्गत केंद्र सरकार राज्यात विविध प्रकल्प उभारणार आहे. राज्याच्या 42 ही प्रकल्प डीपीआरना केंद्र निश्चितपणे मंजुरी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व अधिकारी व खाते प्रमुखांची बैठक घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते. बैठकीत राज्यात चालू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्यात केंद्र सरकारच्या कोणत्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे व कोणत्या योजनांचा लाभ गोव्याला मिळू शकतो, केंद्राच्या प्रकल्पांचे काम कुठपर्यंत पोचले आहे, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची
अंमलबजावणी व प्रकल्पांचा आढावा घेण्याचे काम मुख्य सचिव दर आठवड्याला करतात. आपण दर महिन्याला आढावा बैठक घेतो. त्यानुसार आज बैठक घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीस मुख्य सचिव पुनित कुमार गोयल व विविध खात्यांचे सचिव व खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.