म्हापसा ; पुढारी वृत्तसेवा : चंदगड येथील 11 पर्यटकांना बेदम मारहाण करून लुटणार्या मसाज पार्लरमधील तीन महिलांना येथील पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी तिघांना गजाआड केलेले आहे. दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. त्यांनी मंगळवारीच येथील पोलिस ठाण्यात भेट देऊन पोलिस निरीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. गोव्याची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशाराही पर्यटनमंत्र्यांनी दिला आहे.
चंदगड येथील 11 युवकांचा गट कळंगुट येथे पर्यटनासाठी आलेला होता. त्यांना येथील बोडगेश्वर मंदिराजवळ चांगल्या हॉटेलमध्ये स्वस्तात जेवण देतो, असे सांगून मसाज पार्लरमध्ये नेऊन लुटले होते. तेथील महिलांच्या बरोबर या मुलांना विवस्त्र करून चित्रिकरण केल्याचा आरोपही आहे. या ध्वनिचलचित्रफितीद्वारे धमकावून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केलेला होता. याप्रकरणी तीन महिलांसह सहा जणांना अटक झाली असून, आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. संबंधित मसाज पार्लरच्या मालकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी आहे.
चार दिवस पोलिस कोठडी
संशयित आरोपींना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा न्यायालयाने दिला आहे. गेल्या 24 मे रोजी दुपारी 12.30 वा. हा प्रकार घडला होता. रविवारी 29 रोजी म्हापसा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम 347, 504, 323, 395, 506 (2), 298 व 34 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. सचिन राजकुमार भारद्वाज (26, पालवल हरियाणा), आशिष जगीर सिंग (27, गुरगांव, हरियाणा) व मुबारक अली मौला (20, नायकावाडा, कळंगुट व मूळ तामिळनाडू) या संशयितांना अटक केली होती. या संशयितांना पोलिसांनी सोमवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
कठोर कारवाई करू : पर्यटनमंत्री
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोव्याच्या किनारी भागात स्थानिकांच्या मदतीने परराज्यातील लोक दलालीचा व्यवसाय करतात. त्यातील काही घटक गुन्हेगारी कृत्ये करतात. पर्यटकांना लुबाडणार्या अशा टोळ्याच कार्यरत आहेत. काही मसाज पार्लर, स्पा बेकायदा आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. म्हापशाचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. कळंगुट भागातील बेकायदेशीर डान्स बारही बंदच केले पाहिजेत. कोणतेही बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही.
गोव्याची बदनामी करणारा व्हिडीओ
चंदगड पोलिस ठाण्याच्या बाहेर संबंधित 11 पर्यटकांना पाठमोरे उभे करून चित्रित केलेली ध्वनिचलचित्रफीत (व्हिडीओ) समाजमाध्यमात खूप फिरते आहे. आपले मित्र गोव्याला पर्यटनाला जात असतील तर त्यांना हा व्हिडीओ दाखवा, असे आवाहन या ध्वनिचलचित्रफितीत केलेले आहे. एका गुन्हेगारी घटनेमुळे संपूर्ण गोव्यात असे घडते आहे, असा पर्यटकांचा गैरसमज होण्याची मोठी शक्यता आहे. घटना घडलेली आहे आणि कारवाई सुरूही झालेली आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी केली जाऊ नये, असे आवाहन गोवेकर समाजमाध्यमात करत आहेत.
लुटलेला मुद्देमाल
फिर्यादी पिडीत 11 जणांच्या गटाकडून संशयितांनी 1 लाख रोख व एक सोनसाळी, अंगठी मिळून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लुटला होता. यातील मुद्देमाल पोलिसांना सापडलेला नाही.