

पणजी; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री, टिकटॉक स्टार व भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक बुधवारी सकाळी हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात पोहोचले. इथे पोलिसांनी सोनाली यांचा गायब झालेला कम्प्युटर ऑपरेट शिवमला अटक केली. त्यामुळे सोनाली यांच्या खुनाचे सत्य उलगडणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासावर आपण असमाधानी आहोत. सोनाली यांचा नियोजनबद्धरित्या खून झाला असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांची कन्या यशोधरा फोगाट हिने बुधवारी पुन्हा केली.
सोनाली फोगाट यांचा गोव्यात 22 ऑगस्ट रोजी हणजूणमधील कर्लिस बारमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान, त्याचा मित्र सुखविंदर सिंग यांना अटक केली होती. त्यानंतर कर्लिस बारचा मालक एडविन नुनीस, रुमबॉय दत्तप्रसाद गावकर, ड्रग्ज पेडलर रामदास मांद्रेकर यांना अटक केली होती.
सोनाली यांचा मृत्यू झाल्यापासून त्यांच्या हिस्सार येथील फार्महाऊसमध्ये कम्प्युटर ऑपरेटर असलेला शिवम हा आपल्या कुटुंबासह गायब झाला होता. शिवम याने सोनाली यांचा लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर व अन्य कागदपत्रे लंपास केल्याचा आरोप फोगाट कुटुंबीयांनी केला होता. शिवम याला हिस्सार पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सोनाली खून प्रकरणातील सत्य उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हरियाणा येथे गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने बुधवारी हिस्सार जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी हिस्सारचे पोलिस अधीक्षक लोकेंद्र सिंग यांच्याशी चर्चा करतानाच त्यांनी तपासाची माहिती दिली.