गोवा : मोदींच्या उपस्थितीत सोमवारी शपथविधी

गोवा : मोदींच्या उपस्थितीत सोमवारी शपथविधी
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा येत्या सोमवारी, 28 मार्चला होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सकाळी अकरा वाजता हा सोहळा सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय महामार्गमंत्री मंत्री नितीन गडकरी, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, राज्य प्रभारी सी. टी. रवी आणि भाजप शासित राज्यांचे सात मुख्यमंत्री, तसेच भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी हे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

अतिमहनीय व्यक्‍तींच्या प्रवासासाठी बांबोळी येथे हेलिपॅड उभारणीचे काम सुरू झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी त्या परिसराची पाहणी केली. राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांची सचिवालयात बैठक घेतली. बैठकीत कोणत्या अधिकार्‍यावर कोणती जबाबदारी असेल याची निश्‍चिती करण्यात आली आहे. राजशिष्टाचार विभागाकडून या व्यक्‍तींसाठी आलिशान गाड्या भाड्याने घेण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच काही पाहुणे राज्यात राहणार असतील तर हॉटेलात आरक्षणही केले जात आहे. भाजपकडून किती जण या सोहळ्यासाठी निमंत्रित असतील याची माहिती पोलिसांनी सुरक्षा परवान्यांसाठी मागविली आहे. शपथविधी सोहळा बुधवारी, 23 मार्च रोजी होणार होता. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी यायला हवे, असा आग्रह धरला. पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी सकाळी पंतप्रधान गोव्यासाठी वेळ देऊ शकतील, असे कळवल्यानंतर आता सोमवारी शपथविधी घेण्याचे निश्‍चित केले आहे.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांनी मोठा पाठिंबा सार्‍यांनाच दिला. त्यांची प्रचारावरही नजर होती. देशाचा कारभार हाकताना, आंतरराष्ट्रीय घडामोडींत सहभागी होतानाची त्यांनी विधानसभा निवडणुकीकडे दुर्लक्ष केले नाही. निवडणुकीआधी 'आत्मनिर्भर भारत' योजनेतून 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेसाठी त्यांनी मोठी मदत केली. राज्यातील कोविड लसीकरण, स्वयंपूर्ण गोवा मोहिमेतील लाभार्थी यांच्याशी वेळात वेळ काढून संवाद साधला. राजकीयदृष्ट्या दोन खासदार एवढा राज्याचा राजकीय आवाका असूनही पंतप्रधानांनी राज्याच्या विकासात विशेष रस घेतलाआहे. खाणी सुरू करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना
केली.

कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी नव्या सरकारच्या शपथविधीसाठी त्यांनी यावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्यानंतर ते सोमवारी गोव्यात येऊ शकतील, असे कळविण्यात आले. त्यामुळे शपथविधी आता सोमवारी करण्याचे ठरविले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री पदाचा हा दुसरा कार्यकाळ आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, यापूर्वी बुधवारी, 23 मार्चला शपथविधी करण्याचे ठरले होते. परंतु उत्तराखंडमध्ये भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान मोदी, तसेच केंद्रीय गृहमंत्री शहा उपस्थित राहिल्याने गोव्यातील सोहळा पुढे ढकलावा लागला. मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिलेले आहे. या दोन्ही नेत्यांची उपस्थिती असेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सोमवारी रात्री काय घडले?

सोमवारी रात्री भाजपचे काही आमदार पणजीतील एका हॉटेलात एकत्र आले होते. त्यांचा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशास विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. रात्री उशिरा हे आमदार मुख्यमंत्र्यांनाही शासकीय निवासस्थानी जाऊन भेटले. त्यापैकी गोविंद गावडे, रवी नाईक, सुभाष फळदेसाई आणि बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. सुदिन यांच्याविषयी प्रश्‍न विचारला असता त्यांनी तो पक्षाचा निर्णय म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांनी आमदार सहजपणे भेटण्यास आले होते, असे सांगून वेळ मारून नेली तर प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी आमदार बर्‍याच दिवसांनी भेटल्याने चहापानासाठी किंवा जेवणासाठी हॉटेलात एकत्र गेले असतील, असा तर्क व्यक्‍त केला. राजभवनावर जेवण होते; पण तेथे गर्दी वाटल्याने ते मुख्यमंत्र्यांसोबत जेवण घेण्यासाठी बंगल्यावर गेले असतील, असेही तानावडे म्हणाले. मगोपच्या समावेशाचा निर्णय केंद्रीय पातळीवर झाल्याने त्याविषयी प्रदेश पातळीवर चर्चा नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय गुंडाळला.

सात राज्यांचे मुख्यमंत्री येणार

शपथविधी सोहळ्यास अनेक मुख्यमंत्री येणार आहेत. त्यापैकी बसवराज बोम्मई (कर्नाटक), हिमंत विश्‍वशर्मा (आसाम), भुपेंद्र पटेल (गुजरात), पुष्करसिंह धामी (उत्तराखंड), योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), यांथुंगो पट्टण (उपमुख्यमंत्री नागालॅण्ड), शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश) यांनी राज्यात शपथविधीसाठी येण्याचे मान्य केले आहे.

मंत्रिमंडळ निश्‍चिती रविवारी

मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश असेल याविषयी अस्पष्टता कायम आहे. मुख्यमंत्री पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून मंत्रिमंडळाची निश्‍चिती रविवारी करतील, अशी माहिती मिळाली आहे. तोवर केवळ चर्चा सुरु असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news