

धारबांदोडा; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) झालेल्या जोरदार पावसामुळे दूधसागर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे धबधब्याजवळ पर्यटकांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता उभारलेला लोखंडी पूल पाण्याच्या प्रवाहामुळे जागेवरून सरकल्याने सुमारे 40 पर्यटक धबधब्याच्या बाजूने अडकून पडले. त्यांना वन कर्मचारी आणि जीव रक्षकांनी सुखरूप नदीच्या अलीकडे आणले.
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे काही काळ पर्यटन हंगाम बंद करण्यात आला, अशी माहिती वनाधिकारी सिद्धेश नाईक यांनी दिली. धबधब्याजवळ जाण्यासाठी तात्पुरता एक लोखंडी पूल बसविला जातो. शुक्रवारी संध्याकाळी अचानक कर्नाटक सीमेवर पाऊस पडल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली व पूल जागेवरून हलला होता.
यामुळे पर्यटक दूधसागरच्या बाजूने अडकून पडले. त्यांना जीवरक्षक आणि वनकर्मचार्यांनी सुखरूप अलीकडे आणण्यात यश मिळविले.