दिगंबर, मायकल यांना अपात्र ठरवा

दिगंबर, मायकल यांना अपात्र ठरवा
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ काँग्रेस आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व विरोधी पक्षनेते पदावरून कालच हटवलेले ज्येष्ठ आमदार मायकल लोबो या दोन आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी, 11 रोजी पर्वरी येथील सचिवालयाच्या आवारात दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कृती पक्षविरोधी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार पक्षविरोधी कारवाई करणे म्हणजेच पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्यासारखेच असते. त्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी काँग्रेसने सभापतींकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

पाटकर म्हणाले, दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी केलेल्या कृत्याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. गोवा प्रभारी आणि केंद्रीय नेतृत्वाने ठरविल्यानुसार पक्षविरोधी कारवाई करणार्‍यां विरुद्ध कडक पावले काँग्रेस उचलत आहे. त्या अनुषंगाने दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे, अशी मागणी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे काँग्रेसने केल्याचे पाटकर यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या गळाला फक्त पाचच आमदार लागले. दोन तृतीयांश आमदार काँग्रेसमधून फुटले नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने पक्षातील फूट तूर्त टाळली आहे. फुटिर गटाचे नेतृत्व करणारे दोघे आमदार काँग्रेसला आमदार म्हणून नको आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते पदावरून पक्षाने मायकल लोबो यांची रविवारीच उचलबांगडी केली आहे. नवा विरोधी पक्षनेता रात्री उशिरापर्यंत निवडला जाईल, असेही पाटकर म्हणाले. भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही. त्यांना विरोधकही नको आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोपही पाटकर यांनी यावेळी केला .

आपण सध्यातरी काँग्रेसमध्ये आहे. आपणास विरोधी पक्षनेतेपदावरून हटवल्याची चर्चा आपण ऐकली आहे. अद्याप आपणास तसे पत्र मिळालेले नाही. पक्षांतराबाबत आपण काहीच बोलणार नाही. सध्या तरी आपण काँग्रेसमध्ये आहे.
मायकल लोबो,आमदार, काँग्रेस

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news