

मडगाव; रविना कुरतरकर : पाण्याचे बिल न भरल्यास मीटर कापण्याची आक्रमक भूमिका बांधकाम खात्याने घेतली आहे. वसुलीसाठी अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष मोहीम राबवत गेल्या पंधरा दिवसांत 741 जणांचे मीटर कापण्यात आले आहेत. बिल भरले तरीही त्यांना पुन्हा जोडणी दिली जाणार नसून संबंधितांना मीटरसाठी नव्याने अर्ज करण्याच्या सूचना खात्याने दिले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पाण्याचे बिल थकीत असणार्यांचे मीटर काढून टाकण्यास सुरुवात केली होती. याचा धसका घेत अनेकांनी अनेकांनी बिले भरली तरीही त्यांना पाण्याची जोडणी अद्याप दिलेली नाही. बिल भरले तरीही त्या ग्राहकांना पुन्हा नव्याने मीटरसाठी अर्ज भरावे लागणार असून तोपर्यंत पाणी पुरवठ्याशिवाय राहवे लागणार आहे.
पाण्याची थकीत बिले भरण्यासाठी सरकारने जारी केलेल्या वन टाईम सेटलमेंट योजना जाहीर केली होती. त्यामुळे सवलतीच्या दरात बिल भरता येत होते. तरीही अनेकांनी बिल भरण्याचे टाळले असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचार्यांनी थेट घरोघरी मोहीम राबविली आणि थकबाकीदारांचे मीटरच कापून टाकले. काही घरांचे 2 हजार तर काहींचे 20 हजार पर्यंत बिलांची रक्कम पोचली होती. तर काही थकीत व्यावसायिक आस्थापनांचे बिल सुमारे 30 हजार रुपयांपर्यंत पोचली आहे. ही कारवाई करताना अधिकारी कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत. थकबाकी वसुलीसाठी सरकारने वन टाईम सेटलमेंट ही योजना राबविली आहे. या योजनेची मुदत 28 फेबु्रवारीपर्यंत होती. मात्र, लोकांच्या हितासाठी या योजनेची मुदत 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेमुळे थकीत बिल वसुलीला फायदा होत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
सहायक अभियंता संदीप फडते म्हणाले की, सासष्टीमध्ये पाण्याचे बिल न भरलेल्या 741 जणांचे मीटर कापण्यात आले आहेत. वन टाईम सेटलमेंट योजनेची मुदत सरकारने वाढविली असून, त्याचा फायदा घेत थकबाकीदारांनी बिलांची भरणा करावी, असे आवाहन केले.