तीन हजार टॅक्सी परवान्यांवर गडांतर?

तीन हजार टॅक्सी परवान्यांवर गडांतर?

पणजी; पुढारी वृत्तसेवा : कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टॅक्सी चालकांची भाडे दरवाढीची मागणी अखेर राज्य सरकारने मंजूर केली आहे. प्रति किलोमीटरमागे 3 रुपयांची वाढ दिली असून, त्याविषयीची अधिसूचना वाहतूक संचालनालयाने बुधवारी जारी केली आहे.

त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डिजिटल मीटर बसविण्याकडे अद्याप 2 हजार 934 टॅक्सी चालक दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या परवान्यांवर गडांतर येऊ शकते, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याच्या सक्‍तीकडे अजूनही टॅक्सीचालक गांभीर्याने घेत नाहीत. टॅक्सी चालकांना डिजिटल मीटर बसविण्याविषयी वारंवार सरकारने सूचना केल्या आहेत. त्याशिवाय या मीटरच्या शुल्कामध्ये सवलत देऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत.

राज्यात एकूण 3 हजार 584 प्रवासी वाहतूक करणार्‍या टॅक्सी आहेत. त्यापैकी 137 जणांनी मीटर बसविले आहेत, तर 513 जणांना मीटरसाठी नोंदणी केली आहे. उर्वरित 2,934 टॅक्सी चालकांनी मीटर बसविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे सरकारचे आदेश नाहीत, आम्ही उच्च न्यायालयाच्या सूचना पाळत आहोत.

सर्व टॅक्सीचालकांना उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा लागणार आहे. त्यामुळे जे कोणी त्यापासून फारकत घेत आहेत, त्यांचे परवाने रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मीटर बसविण्यासाठी राज्य सरकार त्यांना सवलत देत आहे. मीटर बसविल्यानंतर काही दिवसांतच त्यांना अर्धी रक्‍कम मिळणार आहे. तर अर्धी रक्‍कम एक वर्षानंतर मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

काळी-पिवळ्या टॅक्सीवाल्यांच्या काऊंटरविषयीची फाईलही लवकरच निकाली निघेल. त्याचबरोबर विमानतळावर त्यांना आम्ही दोन काऊंटर देणार आहोत. त्यांना एवढी मदत करूनही ते सहकार्य करीत नाहीत. खाणी बंद असल्याने पर्यटन हेच सोन्याचे अंडे आहे. त्यामुळे पर्यटनाचे ते राजदूत असल्याने त्यांनी पर्यटन वाढीसाठी त्यांनी मदत करावी, असे ते म्हणाले.

टॅक्सी चालकांच्या संघटनातील नेते अनेक टॅक्सी चालकांचे डोकी भडकावीत आहेत. अनेकांच्या घरी खायाला अन्‍न नाही, अशी स्थिती आहे. काहीजण आता मासळी आणि भाजीही विकू लागले आहेत, असेही गुदिन्हो यांनी नमूद केले.

सर्वसंमतीने निर्णय घेणार

राज्य सरकारने टॅक्सी चालकांना प्रतिकिलोमीटर तीन रुपये भाडेवाड देण्याचे जाहीर केले आहे. त्याची अधिसूचनाही राज्य सरकारने काढली आहे. या भाडेवाढीकडे संघटना कशी पाहते याची विचारणा टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष बप्पा कोरगावकर व सदस्य योगेश गोवेकर यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी आम्ही संघटनेच्या सदस्यांना विचारून पत्रकार परिषदेद्वारे म्हणणे सादर करणार असल्याचे सांगितले.

जोखीम घेण्यास अधिकारी असहमत

दोन आणि तीन सीरिज लवकरच सुरू केली जाईल, कारण 18 ऑगस्ट त्याची मुदत आहे. मीटर बसविण्यासाठी 4 केंद्र होते, आता आठ केंद्र आम्ही केली आहेत. सगळ्या सोयी टॅक्सी चालकांसाठी आहेत, हे समजून घ्यावे. वाहतूक खात्याचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत असून, ते आता कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाहीत. उच्च न्यायालयाचा आदेश आम्हाला पाळावा लागणार आहे, त्यामुळे आम्ही कोणताही दुसरा मार्ग त्यांना देऊ शकणार नाही, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news