पणजी : पुढारी वृत्तसेवा : भाजपने वेळोवेळी लोकशाही विरोधी निर्णय घेतले आहेत. राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे हा त्यातील एक भाग आहे. या विरोधात आता बोलले नाही तर भविष्यात देशात हुकूमशाही येऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांसह सामान्य जनतेने एकत्र यावे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.
रविवारी पक्षातर्फे जुने गोवे येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ संकल्प सत्याग्रह करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सत्याग्रहात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, एल्टन डिकोस्टा, महिला विभाग अध्यक्षा बिना नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट जनता पक्ष बनला आहे. राहुल गांधींनी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले म्हणूनच त्यांना अपात्र करण्यात आले. याआधी भारत जोडो यात्रेला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून भाजप घाबरले होते. त्यांनी काही निमित्त करून राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. असे असले तरी आम्ही लोकांच्या हक्कांसाठी लढत राहू.
युरी आलेमाव म्हणाले, हा निर्णय भाजपला जड जाणार आहे. ही भाजपच्या शेवटाची सुरुवात आहे. भाजप नेहमीच क्रोनी कॅपिटलिस्टच्या बाजूने असते. आता आपण सर्वांनी देशाच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे ते म्हणाले.