

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात ग्रामीण भागातील आकर्षक स्थळांना पर्यटन नकाशावर आणण्यासाठी पर्वरी ते हरवळे असे हिंडरलँड टुरिझम सर्किट स्थापन केले जात आहे. यात पर्वरी, मये, हरवळे, तांबडी सुर्ल येथील प्रेक्षणीय स्थळेे व ऐतिहासिक स्थळांचा समावेश असेल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी हिंडरलँड टुरिझम विषयावर विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना खंवटे यांनी वरील माहिती दिली. हिंडरलँड टुरिझम सर्किटमध्ये डिचोली येथील पांडव गुहा व नमाज घर यांचा समावेश करावा. तसेच धुमाशे व साळचा समावेश या योजनेत करावा, अशी मागणी डॉ. शेट्ये यांनी केली.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी हिंडरलँड टुरिझम सर्किट अंतर्गत मये तलावाचा विकास होत आहे. तसेच मयेतील इतर चांगल्या जागांचा समावेश करावा, अशी मागणी केली. यावेळी उत्तर देताना खंवटे म्हणाले की, मये तलावाचा विकास थीम पार्क म्हणून दोन टप्प्यात होत आहे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेंतर्गत ही विकास कामे होत असल्याचे सांगून पांडव गुहा ही पुरातत्त्व खात्याकडे आहे. ती पर्यटन खात्याकडे घेऊन विकास करावा लागणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.