गोवा : स्तन कर्करोगाचे वर्षाला 200 वर रुग्ण

गोवा : स्तन कर्करोगाचे वर्षाला 200 वर रुग्ण

पणजी;  विठ्ठल गावडे- पारवाडकर :  राज्यात दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाचे (कॅन्सर) 200 ते 250 रुग्ण आढळतात. 30 ते 50 वयोगटांतील महिलांना स्तनाचा कर्करोग होतो, असा अनुभव आहे. उशिरा लग्न करणे आणि मुलांना दूध न पाजणे ही स्तन कर्करोग होण्याची मुख्य कारणे आहेत. प्रसिद्ध कर्करोग उपचार तज्ज्ञ तसेच भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर विभागाचे संयोजक डॉ. शेखर साळकर यांनी दै. 'पुढारी'ला ही माहिती दिली.

ते म्हणाले, गोव्यामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या 550 ते 600 च्या आसपास कर्करोगाचे रुग्ण मृत्युमुखी पडतात. राज्यात सध्या विविध प्रकारच्या कर्करोगाचे 1500 च्या आसपास रुग्ण आहेत. लवकर तपासणी करून निदान झाल्यास पहिल्या टप्प्यात स्तनाचा कर्करोग बरा होण्याची शक्यता 90 टक्के असते. हेच प्रमाण दुसर्‍या टप्प्यामध्ये 80 तर तिसर्‍या टप्प्यामध्ये 50 टक्के होते. स्तन कर्करोगाची पहिल्या टप्प्यात तपासणी न करता, उपचार न घेता थेट शेवटच्या टप्प्यात तपासणी करून निदान झाल्यास रुग्ण बरा होण्याचे प्रमाण फार कमी असते. अशा वेळी स्तन काढावेे लागतात.  ते म्हणाले, गोव्यामध्ये सरकारच्या दीन दयाळ स्वास्थ्य योजनेअंतर्गत खासगी इस्पितळातही स्तन कर्करोगावर योग्य ते उपचार होऊ शकतात. 30 वर्षावरील सर्वच महिलांनी मेमोेग्राफी अर्थात स्तन कर्करोगाची तपासणी करणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व सरकारी इस्पितळातील डॉक्टर आणि परिचारिकांना मेमोग्राफी तपासणीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे 30 वर्षावरील महिलांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.

ते म्हणाले, केंद्र सरकारने या वर्षी कर्करोग तपासणीसाठी सर्वच राज्यांना आदेश दिले आहेत. त्यामध्ये स्तनाचा, तोंडाचा व आतड्यांच्या कर्करोगाचा समावेश आहे. विशेषत: महिलांची तपासणी करून त्यावर उपचार करण्याच्या आदेश केंद्रानेे दिले आहे. जनजागृती करून मेमोग्राफीपध्दतीने सुलभ तपासणी केल्यास, स्तनामध्ये गाठ असल्यास डॉक्टरांना दाखवल्यास कर्करोगावर मात करता येते. ऑक्टोबर महिना हा पिंक मंथ म्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी ही तपासणी मोहीम राज्याराज्यांमध्ये सुरू आहे. गोव्यातील महिला विशेषता नोकरीला असलेल्या महिला उशिरा लग्न करतात, त्यानंतर मूल उशिरा होऊ देतात आणि मुलांना दूध देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले.

सरकारी योजनेतून उपचार शक्य

गोव्यामध्ये गोवा सरकारची दीनदयाळ स्वास्थ्य योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत स्तन कर्करोगावर हवे ते उपचार व शस्त्रक्रिया होते. पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील स्तन कर्करोगावर यशस्वी उपचार होतात. खाजगी इस्पितळांमध्ये एरवी 4 ते 5 लाख रुपये खर्च या शस्त्रक्रियेसाठी येत असतो. मात्र हाच खर्च दीन दयाळ योजनेखाली असलेल्या खासगी इस्पितळातही अवघ्या 25 ते 35 हजारात होऊ शकतो, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली.

मद्य, धूम्रपान करणार्‍याना धोका

ज्या महिला मद्य पितात किवा धूम्रपान करतात तसेच सतत तेलकट, मसालेदार पदार्थ खातात आणि ज्या महिला स्थूल आहेत. अशा महिलांना स्तन कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवून वयाच्या 30 नंतर मेमोग्राफी तपासणी करावी व वरील पदार्थ टाळावेत, असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले.

लवकर लग्न करा, बाळाला दूध पाजा

ज्या महिला 30 वर्षांनंतर लग्न करतात. व त्यानंतर मूल होण्यास उशीर करतात तसेच मुलांना स्तनपान करण्याचे टाळतात, असा महिलांना स्तन कर्करोग होण्याचे प्रमाण हे 50 टक्के असते. त्यामुळे मुलींनी वयात आल्यानंतर लग्न करावे, मूल लांबवू नये व बाळाला स्तनपान करावे. ज्यामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी राहते, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली.

33 हजार महिलांची तपासणी; 15 रुग्ण

युवराज सिंग फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य खात्याने राज्यात 1 लाख महिलांची स्तन कॅन्सर (मेमोेग्राफी) तपासणी करण्याचे ठरवले आहे. ही तपासणी सुरू झाली असून, आतापर्यंत 33 हजार महिलांची तपासणी गोवाभर केल्यानंतर त्यामध्ये 15 महिलांना स्तन कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. त्या महिलांना त्वरित उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 33 हजार महिलांच्या तपासणीमध्ये 300 ते 400
महिलांच्या स्तनामध्ये ट्यूमर आढळून आले. मात्र, ते उपचाराने बरे होतात कारण तो कॅन्सर नसतो, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news