गोवा : सावर्डेत गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

गोवा : सावर्डेत गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला
Published on
Updated on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  सावर्डे मतदारसंघात प्रतिष्ठेच्या समजल्या सावर्डे पंचायत क्षेत्रावर आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी आमदार गणेश गावकर यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. गेली पाच वर्षे सावर्डेचे माजी मंत्री दीपक पावसकर यांच्या ताब्यात होती. यावेळी पावसकर यांनी पुन्हा आपले लक्ष पंचायतीवर केंद्रीत केले असून नऊही प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत.

एकाच प्रभागात भाजपच्या उमेदवारांमध्ये असलेली थेट लढत, भाजप अंतर्गत फुटाफूट, आमदार गावकर यांची निवडून येईल तो आपला ही भूमिका तसेच सांतोन येथील प्रदूषणकारी प्रकल्पाला भाजपच्या उमेदवारांनी दिलेला पाठिंबा अशा विविध कारणामुळे सावर्डे पंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचे माजी सरपंच असलेले बंधू संदीप पाऊसकर यांनी बागवाडा प्रभागातून पत्नी सिद्धी प्रभू पाऊसकर यांना निवडणुकीत उतरवले आहे. मिराबाग, धडे, कापशे, गुड्डेमळ या प्रभागात त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. सावर्डे मतदारसंघाचा केंद्रबिंदू म्हणून सावर्डे पंचायतीकडे पाहिले जाते. संदीप पाऊसकर यांनी पाच वर्षें ही पंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती. त्यामुळे आता आमदार गणेश गावकर यांच्यासाठी सावर्डेची पंचायत निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा बनली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये चुरस लागली असून थेट लढत असलेल्या प्रभाग तीन आणि प्रभाग सात मधील चारही उमेदवार भाजपचे कट्टर समर्थक असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

टोनीनगरच्या प्रभाग तीनमध्ये थेट लढत असलेले माजी सरपंच दीपक सावंत आणि सर्वेश सावंत हे दोघेही भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. दीपक सावंत यांनी आमदार गणेश गावकर यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे. त्यांच्या बॅनरवर गणेश गावकर यांचे छायाचित्रही आहे. पण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे सर्वेश सावंत यांनाही भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा पाठींबा आहे. संकेत अर्सेकर हे त्यांच्यासाठी काम करत आहेत. खासदार विनय तेंडुलकर यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या प्रभागात दोन्ही युवा उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित असून भाजपच्या मतदारांमध्ये फूट पडणार असल्याने बिगर भाजप मतदार कोणाच्या बाजूने मतदान करतील यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

बागवाडा दोन म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रभाग सात मध्येही तिच स्थिती आहे.पूर्वी पाऊसकर यांचे कट्टर समर्थक असलेले माजी पंच नितेश भंडारी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित विर्नोडकर हे दोघेही भाजपाच्या समर्थनावर निवडणूक लढवत आहेत. दोघांनीही स्वतःच्या बॅनरवर आमदार गणेश गावकर यांचे छायाचित्र लावले आहे. याही प्रभागात भाजप समर्थक मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. आंबेउदक या प्रभाग एकमध्ये एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग दोनमध्ये सोनाली भंडारी आणि उन्नती वडार यांच्यात थेट लढत आहे.आनंदवाडीत तब्बल नऊ उमेदवार रिंगणात आहेत.ज्यात नवोदित चेहर्‍यांचा जास्त समावेश आहे.धडे येथे सुनील भंडारी आणि शशिकांत नाईक यांच्यात लढत अपेक्षित आहे तर मिरबाग येथे दोन उमेदवरांमध्ये थेट लढत आहे.

सिद्धी पाऊसकर रिंगणात
मावळते सरपंच आणि माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचे बंधू संदीप पाऊसकर यांनी महिलांसाठी राखीव असलेल्या बागावाडा प्रभागात पत्नी सिद्धी पाऊसकर यांना रिंगणात उतरवले आहे. याच प्रभागातून माजी पंच आणि सांगे मतदारसंघातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी पत्नी विद्या सावर्डेकर यांना रिंगणात उतरवले आहे. यांच्यासह कोमल कुडाळकर याही रिंगणात आहेत. चार्ट्ड अकाऊंटंट असलेल्या सिद्धी पाऊसकर यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. समीकरणे जुळल्यास सिद्धी यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news