

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीत 10 मार्च रोजी भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळणार यावर भाजपच्या नेत्यांनी बुधवारी उमेदवार, मतदारसंघ प्रभारी आणि निवडणूक प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत शिक्कामोर्तब केले. बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (गोवा विधानसभा निवडणूक) यांनी भाजप 22 हून अधिक जागा या निवडणुकीत जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी 26, तर माजी आमदार रवी नाईक यांनी 27 जागा जिंकणार असल्याचा दावा केला.
येथील एका हॉटेलात (गोवा विधानसभा निवडणूक) झालेल्या बैठकीत उमेदवारांकडून त्यांना पडणार्या मतांविषयी भाजप नेत्यांनी जाणून घेतले. कोणत्या भागात मतदान झाले असावे, कोणत्या भागात व का विरोधी मतदान झाले असावे, याची कारणेही ऐकण्यात आली. कोणत्या नेत्या, कार्यकर्त्याने पक्षविरोधी कारवाया केल्या हाही विषय चर्चेला आला. उमेदवारांनी मतदानाविषयी मत मांडले. नेत्यांनी त्यांना काही प्रश्नही विचारले. उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करायचा आहे. त्याविषयी तज्ज्ञानी बैठकीत मार्गदर्शन केले.
मतमोजणीदिवशी उमेदवाराने मतमोजणी केंद्रात आपल्यासोबत कोणत्या सात जणांना न्यावे. मतमोजणी प्रतिनिधी म्हणून कोण काम पाहाणार याचे नियोजनही करण्यात आले. बैठकीनंतर रवी नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, मतमोजणी दिवशीच्या नियोजनासाठी बैठक होती. मतमोजणी दिवशी उमेदवारासोबत कोण असेल याचे नियोजन केले गेले. मतमोजणी संदर्भातील नियमांची माहितीही बैठकीत देण्यात आली. उमेदवारांना किती मते पडतील याचा अंदाजही विचारण्यात आला. मुख्यमंत्री (गोवा विधानसभा निवडणूक) म्हणतात, 22 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर मी म्हणतो 27 पेक्षा जास्त जागा मिळतील.
पक्षाचे सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर (गोवा विधानसभा निवडणूक) यांनी सांगितले, की मतदान झाल्यावर अशी बैठक नेहमीच घेतली जाते. उमेदवार व पक्षाची कामगिरी याचा आढावा घेणे आणि पुढील नियोजन करणे यासाठी अशी बैठक घेणे आवश्यक असते. भाजप तिसर्यांदा सरकार स्थापन करणार यात कोणतीही शंका नाही. बैठकीत उमेदवारांनी दिलेल्या माहितीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रत्येक उमेदवाराची जिंकून येणार ही भावना आहे.
गुदिन्हो म्हणाले, की मतदानाचे बैठकीत विश्लेषण करण्यात आले. 10 मार्चचा संभाव्य निकाल कसा असू शकतो याची कल्पना बैठकीत आली. 24 जागा भाजप जिंकू शकेल. मतमोजणीनंतर आमदार मुख्यमंत्री ठरवणार असे नाही तर केंद्रीय संसदीय मंडळ त्याविषयी निर्णय घेणार आहे. प्रत्येक पक्षात तशीच पद्धत असते. भाजपमध्येही गोव्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली जाणार नाही. तानावडे म्हणाले, केपेत विरोधात मतदान झाले असा अपप्रचार करण्यात आला. केपेतून बाबू कवळेकर पुन्हा जिंकणार आहेत. 2002 पासून ते आमदार आहेत. त्यापूर्वी ते जिल्हा पंचायत सदस्य होते. ते लोकनेते आहेत. बैठकीत (गोवा विधानसभा निवडणूक) आम्ही मतदानाचा आढावा घेतला त्यावरून 22 हून अधिक जागा जिंकणार हे नक्की झाले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (गोवा विधानसभा निवडणूक) म्हणाले, साखळीत सर्वाधिक मतदान झाले याकडे सर्वांचे लक्ष गेले. साखळीत मागील निवडणुकीत किती मतदान झाले होते हे कोणीच पाहिले नाही. साखळीत मतदानाचा टक्का तीन टक्क्यांने यंदा घटला. विरोधक तेवढ्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात अपयशी ठरले. मगोचे कार्यकर्तेच साखळीत दिसत नव्हते. 22 हून अधिक जागा आम्ही जिंकणार यावर आम्ही ठाम आहोत. बैठकीत मतमोजणीच्या दिवशीचे नियोजन करताना मतदानाचे विश्लेषण करण्यात आले. त्याआधारे आम्हाला 10 मार्चचा निकाल अपेक्षित आहे.