

वास्को (गोवा) : पुढारी वृत्तसेवा
येथील वरेग बेट व सांत जासिंतो बेटाच्या आसपास मिळणार्या तिसर्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे, असे चिखली जैवविविधता व्यवस्थापन समितीच अध्यक्ष सिरिल फर्नांडिस यांनी सांगितले. बेटावर गर्दी करणार्यांपैकी बहुतेकजण पूर्ण वाढ न झालेल्या तिसर्यो काढत असल्याने तिसर्यांचे प्रमाण घटत चालल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
तिसर्यो हे गोमंतकीयांचे आवडते आहेत. ताटामध्ये मूठभर तिसर्यो असल्याशिवाय कोणतीही मच्छी थाळी पूर्ण होत नाही. संपूर्ण गोव्यातून ताज्या तिसर्यांची नेहमीच मागणी असते. पूर्वी गोव्यातील सर्व नद्यांमध्ये भरपूर प्रमाणात तिसर्यो उपलब्ध होत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून तिसर्यांचे उत्पन्न मोठ्या फरकाने कमी होत आहे. वरेग बेट हे तिसर्यांचे सर्वकालीन आवडते प्रजनन स्थळ आहे. या स्थळावर मोठ्या प्रमाणात मिळणार्या 'तिसर्यो' विकून स्थानिक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अलिकडच्या काळात तिसर्यो काढण्यासाठी येणारे 'हौसे नवसे' आकार न पाहता सरसकट तिसर्यो ओरबडून काढत आहेत. त्यामुळे तिसर्यो मिळण्याचे प्रमाण कमी होत चालले असल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला.
वरेग बेट, सेंट जासिंतो बेटाच्या आसपासचा परिसर आणि सांकवाळ गावाजवळील नदीकाठ हे तिसरो, कालवा (ऑयस्टर) आणि विंडो-पेन ऑयस्टर (मेंडिओस) च्या संरक्षित प्रजातींचे पारंपरिक प्रजनन केंद्र आहेत. मात्र खाडीतून तिसरो, कालवा, मेंडिओस काढताना संबंधित कोणताही सारासर विचार करीत नसल्याने तसेच इतर औद्योगिक कारणांमुळे या सागरी प्रजातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असल्याचे त्यांनी सांगितले.
चिखली जैवविविधता वारसा स्थळ समितीने वरेग बेटाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आणून एक ठराव समंत केला होता. त्या ठरावाला चिखली जैवविविधता व्यवस्थापन समितीने मान्यता देऊन तो ठराव गोवा राज्य जैवविविधता मंडळाकडे चिखली पंचायत कार्यालयामार्फत पाठविण्यात आला होता. त्या ठरावाची अमलबजावणी कधी होते, याची वाट समिती पाहत आहे. चिखली ग्रामपंचायतीने वरेग बेटाकडे जाणार्या पाऊलवाटेवर एक कापडी फलक लावला आहे. सदर स्थळ पर्यावरणीदृष्ट्या संवेदनशील सागरी स्थळ आहे. त्याचे आम्ही संवर्धन करू इच्छितो, असे फलकावर लिहले आहे. परंतू त्या फलकाकडे दुर्लक्ष करून बरेचजण तिसर्यो काढतात, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी गंभीर दखल घेताना चिखली व सांकवाळ जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी गोवा राज्य जैवविविधता मंडळाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. तिसर्यो, कालवा मिळविताना संबंधित नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
गोवा राज्य जैवविविधता मंडळाने अशा संवेदनशील प्रजनन स्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची सर्व ग्रामपंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी झाली नाही, तर भावी पिढीला जैवविविधता संपत्तीला मुकावे लागेल, अशी भीती फर्नांडिस यांनी व्यक्त केली.