गोवा : रेतीअभावी बांधकाम व्यवसाय ठप्प

गोवा : रेतीअभावी बांधकाम व्यवसाय ठप्प

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : कुडचडेतील बाणसाय येथे रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबार प्रकरणाचे पडसाद राज्यातील बांधकाम व्यवसायावर पडले आहेत. राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेला रेती उपसा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. तळकोकणातील वाळू व्यावसायिकांनी कुडचडे प्रकरणाचा धसका घेऊन गोव्यात गाड्या पाठवणे बंद केल्याने रेतीअभावी राज्यातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

बाणसाय येथे 1 सप्टेंबर रोजी बेकायदेशीर रेती व्यवसायातून एका कामगाराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या गोळीबारात अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाला आता 12 दिवस उलटून गेले आहेत. गोळ्या झाडणारा अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही. खूनी अद्याप गजाआड झाला नसला तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे रेती व्यवसाय करणार्‍या सहा जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. रेती व्यवसायातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी रेती व्यवसायात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभाग असलेल्या शेकडो जणांची चौकशी केली आहे. त्याचा धसका घेऊन कुडचडे आणि सावर्डेत सुरू असलेला रेतीचा व्यवसाय लोकांनी स्वतःहून बंद केला आहे. नदीत असलेल्या होड्या बाहेर काढण्यात आल्या असून भविष्यात हा व्यवसाय पुन्हा सुरू होणे अशक्य असल्याने काहींनी आपल्या होड्या विकून टाकल्या आहेत.

कापशे भागात काही युवक रात्री अंधारात रेती काढण्याचा व्यवसाय करत होते. शिरोडा आणि बोरीतही चोरीछुपे हा व्यवसाय सुरू होता. गोळीबाराच्या या घटनेनंतर मात्र सर्वांनी रेतीचा व्यवसाय बंद केला आहे. वळवई, उसगाव, वाघूर्मे, बेतकी, पेडणे येतील व्यावसायिकांनीही 12 दिवसांपासून आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. कुडचडेतील त्या घटनेमुळे राज्यात कुठेही रेती उपलब्ध नाही. कुडाळ येथे रेती उपलब्ध आहे पण वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून वाहतूक पोलिसांना रेती वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेजारील सिंधुदुर्गातील रेती व्यावसायिकांनी आपल्या गाड्या गोव्यात पाठवणे बंद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news