

पणजी; पुढारी वृत्तसेवा : देशात वाढलेले रस्ता अपघात व त्या अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर बॅक सीट बेल्ट अनिवार्य करण्याबाबत केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हल्लीच सुतोवाच केले होते. नव्या वाहतूक नियमात तशी तरतूद आहे. गडकरी यांनी चारचाकी वाहनात मागे बसणार्यांनाही सीट बेल्ट अनिर्वाय करण्याचा विचार जाहीर केल्यानंतर गोव्यातही त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे कळते.
वाहतूक खात्याच्या अधिकार्याने सोमवारी दि. 19 रोजी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात सर्वाधिक रस्ते अपघात व रस्ता मृत्यू होत आहेत. 2020 सालात रस्ता अपघातात 223 व्यक्ती मृत्यू पावल्या तर 2021 मध्ये ही संख्या 226 होती. यंदा आत्तापर्यंत 185 व्यक्ती रस्ता अपघातात दगावल्या आहेत. हे पाहता, राज्य परिवहन संचालनालयाच्या अंमलबजावणी विभागाने बॅकसीट बेल्ट वापरणे अनिवार्य करण्याचा विचार केला आहे. सध्या कारच्या पुढे बसणार्यांना सीट बेल्ट अनिवार्य आहेच. पण, कारच्या अपघातात मागील सीटवरील व्यक्ती जबर जखमी किंवा मृत्युमुखी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मागील सीटवर बसणार्यांनाही सीट बेल्ट अनिवार्य होणार आहे.