

पेडणे, पुढारी वृत्तसेवा : मोप विमानतळावर विविध विभागातर्फे दि. 23 रोजी मुलाखती घेण्यासाठी तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त युवकांनी गर्दी केली होती. परंतु, व्यवस्थित नियोजन नसल्याने आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने मुलाखती देणार्या युवकांना मोबाईलवर संदेश येण्यास विलंब झाल्याने एकच गोंधळ उडाला.
पेडणे तालुक्यातील तेराव्या आंतरराष्ट्रीय मोप विमानतळावर एकूण 17 प्रकारांच्या विविध पदांसाठी 23 आणि 24 असे दोन दिवस मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या पहिल्याच दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त युवकांनी नाव नोंदणी केली. नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्येक युवकाला कंपनीमार्फत इमेल किंवा मोबाईलवर संदेश पाठवून त्यांना मुलाखतीबाबत कळवले जाईल, असे सांगण्यात आले.
काही युवकांनी आपली नाव नोंदणी करून संदेश येण्याची वाट बघितली. परंतु दिवसभर युवकांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे युवकांना मुलाखती न देताच माघारी फिरावे लागले. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे हा घोळ झाल्याचे सूत्रांकडून
कळते.
एका बाजूने जोरदार पाऊस आणि मोप विमानतळ परिसरात येण्यासाठी प्रवासी बसेस नसल्याने मुलाखती देणार्या युवक-युवतींची धांदल उडाली. काही पालकांनी कामावर रजा टाकून आपल्या मुलांसह मोपा विमानतळ परिसरात मुलाखतीसाठी सकाळपासून हजेरी लावली होती. त्यांना सायंकाळपर्यंत ताटकळत रहावे लागले.