

पणजी : काँग्रेस सरकार असताना राज्यात अनेक आंदोलने झाली. मात्र, पक्षाने लोकशाही हक्क कधीच दडपले नाहीत, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 'म्हादई'प्रश्नी सभेची परवानगी मागे घेतल्याने त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हिटलरची उपाधी दिली आहे.
चोडणकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने 1980 पासून चांगले आणि प्रभावी प्रशासन केले. या काळात अनेक आक्रमक आंदोलने झाली. यात विद्यार्थी आणि कामगार संघटनांचे आंदोलन, आदिवासी, पारंपरिक मच्छीमार, मोटारसायकल पायलट, कोकणी आंदोलन, कोकण रेल्वे, नायलॉन, प्रादेशिक योजना, मेटा स्ट्रिप अशी आंदोलने झाली. मात्र, काँग्रेस सरकारने जनतेचा लोकशाही हक्क कधीही नाकारला नाही.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेने एकत्र जमण्याचा, निदर्शने, आंदोलने आणि जाहीर सभांद्वारे सरकारच्या कृतीवर आक्षेप घेण्याचा, निषेध सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. परंतु, भाजप नागरिकांच्या या अधिकाराचे उल्लंघन करत आहे. भाजपचा गांधीवादी विचार, सर्वोच्च न्यायालय, भारतीय राज्यघटनेने मान्य केलेल्या लोकशाही भावनेवर अविश्वास आहे का?, असा प्रश्न चोडणकर यांनी केला. संविधानाचा आत्मा जपण्यासाठी आणि नागरिकांना सक्षम करण्यासाठी भाजपने काँग्रेस पक्षाकडून शिकले पाहिजे.