फोंडा; पुढारी वृत्तसेवा : बरकटे – मोले येथील गोविंद कुष्टा गावकर (वय 49) याला बेकायदा चिरेखण चालवल्याच्या आरोपावरून फोंडा पोलिसांनी अटक केली. गोविंद कुष्टा गावकर हा धारबांदोडा जिल्हा पंचायतीवर गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आला होता.
बरकटे – मोले येथे बेकायदा चिरेखण चालवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारचे खाण खाते व कुळे पोलिसांनी संयुक्तरीत्या या खाणीवर छापा टाकला होता. गेल्या 25 जुलै रोजी हा छापा टाकण्यात आला, त्यावेळेला या चिरेखाणीवर चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी मशिनरी सापडली होती. ही सर्व मशिनरी खाण खाते व पोलिसांनी ताब्यात घेतली; मात्र या ठिकाणी कुणीच सापडला नाही. मात्र, ही चिरेखण संशयित गोविंद गावकर चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध खाण खात्याचा सहायक अधिकारी जीतेंद्र वेळूसकर यानी तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार दाखल करून संशयित गोविंद गावकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिरेखाणीच्या व्यवसायातून सुमारे 1 कोटी 39 लाख 71 हजार 195 रुपयांचा डल्ला संशयित गोविंद गावकर याने मारल्यासंबंधीची ही तक्रार दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली होती.
अटकपूर्व जामीन फेटाळला…
गुन्हा दाखल केल्यानंतर गोविंद गावकर याने मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी गेल्या 30 जुलै रोजी केला होता. मात्र हा जामिनासाठीचा अर्ज सोमवारी फेटाळल्यानंतर फोंडा पोलिसांनी संशयित गोविंद गावकर याला कुळे येथे ताब्यात घेतले.