पेडणे; पुढारी वृत्तसेवा : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते नागार्जून यांच्या मांद्रे येथील जागेवरील कथित अवैध बांधकामाची पाहणी मांद्रे सरपंच अमित सावंत व पंचायतीतील अधिकार्यांनी केली. या पूर्वी तशी नोटीस आधीच मांद्रे पंचायतीच्या वतीने देण्यात आली होती. या पाहणीनंतर नागार्जुन यांच्या नावावर येथील घराचे सहा क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. याची सखोल पडताळणी करणार असल्याचे सरपंच अॅड. अमित सावंत यांनी सांगितले.
नागार्जुन यांनी बांधकामासाठी यापूर्वीच सर्व परवानग्या मिळाल्याचा दावा केला आहे. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण आणि या पूर्वीच्या माजी सरपंचांनी सर्व परवानग्या दिल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले आहे. ग्रामपंचायतीने 29 डिसेंबर 2022 रोजी मांद्रेतील 211/2-बी या मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचा ठराव केला होता. या पाहणीत अतिक्रमण झाले आहे किंवा नाही, याची पाहणी केली जाणार होती. त्यानुसार 7 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ही पाहणी करण्याचे ठरले होते. या पाहणीवेळी आवश्यक आणि योग्य त्या दस्तऐवजांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशी नोटीसही पंचायतीने अभिनेते नागार्जून यांना दिली होती.
यापुर्वी अभिनेता नागार्जुन यांचे मांद्रे या गावातील बांधकाम अवैध असल्याचे सांगत पंचायतीने येथील बांधकाम बंद पाडले होते. नागार्जुन यांच्या मालकीची मांद्रे पंचायतीत सर्व्हे क्रमांक 211/2 मध्ये जमीन आहे. या जागेत बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे पंचायतीच्या लक्षात आले. सरपंच अमित सांवत यांनी यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबधित काम बंद पाडले. तसेच, अभिनेते नागार्जुन यांना पंचायतीने नोटीस देखील बजावली. गोवा पंचायत राज कायदा 1994 अंतर्गत पंचायत हद्दीत कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा खोदकाम करताना पंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगत नागार्जून यांना येथील बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली होती.