गोवा : मडगाव नगरपालिकेवर भाजपराज?

गोवा : मडगाव नगरपालिकेवर भाजपराज?
Published on
Updated on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची सत्ता असलेल्या मडगाव नगरपालिकेवर सुमारे एक दशकानंतर भाजपाची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिगंबर कामत गटातील चार आणि विजय सरदेसाई यांच्या गटाचा एक असे मिळून पाच नगरसेवक फोडण्याकरिता भाजप कडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, भघजप विरोधी पाच नगरसेवक भाजपाच्या वाटेवर आहेत. पंधरा ऑगस्ट पूर्वी हे नगरसेवक भाजपात समावेश करून घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काही नगरसेवकांनी दिगंबर कामत यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर
लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास सामूहिक भाजप प्रवेशाची तयारी त्यांनी ठेवली आहे.

कामत गटातून निवडून आलेले पालिकेत सत्ता भोगत असले तरीही त्यांना राज्यात विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणून पाहिले जाते. त्यांचा प्रभागात कामे होत नसल्याने त्यांचे मतदारसुध्दा यांच्यावर नाराज आहेत.कामत यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याने त्या नगरसेवकांची सुध्दा गोची झाली आहे.

मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखीन चार नगरसेवक लवकरच भाजपात
दाखल होणार आहेत अशी माहिती दिली. दै. 'पुढारी' जवळ बोलताना पाचवा नगरसेवक भाजपात येऊ शकतो अशी शक्यता असून 15 ऑगस्ट पूर्वी पालिकेत सत्तांतर घडू शकते असेही ते म्हणाले.

याच महिन्यात गोवा फॉरवर्डचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून अलिखित कारारा प्रमाणे दिगंबर कामत यांच्या गटाकडे नगराध्यक्ष पद जाणार आहे. मात्र भाजपची खेळी यशस्वी ठरल्यास मडगाव नगरपालिका भाजपच्या हाती जाऊ शकते.
मडगाव पालिकेत भाजपचे एकूण सात नगरसेवक निवडून आले होते. तीन महिन्यापूर्वी गोवा फॉरवर्डच्या फातोर्डा फॉरवर्ड या पॅनलमधून निवडून आलेल्या नगरसेवका श्वेता लोटलीकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर अपक्ष निवडून आलेले नगरसेवक महेश आमोणकर यांनी चार दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. आता चार नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच या पक्षात प्रवेश करणार असल्याचे रुपेश महात्मे यांनी सांगितले. कोणत्याही क्षणी हे नगरसेवक भाजपात प्रवेश करू शकतात, आम्ही त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत. या नगरसेवकांनी 15 ऑगस्ट पूर्वी प्रवेश घेतल्यास मडगाव नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ 13 होणार आहे.

रुपेश महात्मे यांनी सांगितले की, दिगंबर कामत यांच्या संपर्कात भाजपचा एकही नेता नाही. ते स्वतःच भाजपात प्रवेश करणार आहेत अशी अफवा पसरवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. कामत यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घ्यावी. त्यानंतरच आम्ही आमचा निर्णय जाहीर करू.

पालिकेतील बलाबल

  • एकूण नगरसेवक 25
  • विजय सरदेसाई यांचा फातोर्डा फॉरवर्ड गट : 7
  •  दिगंबर कामत यांचा
    मॉडेल मडगाव गट : 8
  •  भाजप : 7 +2 = 9
    (श्वेता लोटलीकर, महेश आमोणकर भाजपमध्ये)
  •   अपक्ष : 1 (घनश्याम शिरोडकर)
  •  सत्ता स्थापनेसाठी आवश्यक नगरसेवक :13
  •  सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला हवेत : 4

घनश्याम यांची भाजपशी जवळीक
भाजपाशी जवळीक साधलेल्या एका नगरसेवकाने दै. 'पुढारी' स सांगितले की, ज्येष्ठ नगरसेवक घनश्याम शिरोडकर भाजपाशी जवळीक साधून आहेत. लिंडन परेरा पायउतार झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्यास ते तयार आहेत; पण इतर नगरसेवक भाजपात प्रवेश करणे तितकेच आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news