गोवा पोलिस नापास का होतात? बहुचर्चित प्रकरणांतील तपास निराशाजनकच

गोवा पोलिस नापास का होतात? बहुचर्चित प्रकरणांतील तपास निराशाजनकच
Published on
Updated on

पणजी; मोहन निरपळ : खून, हत्या, संशयास्पद मृत्यू, अपहरण, बलात्कार, ड्रग्जचे व्यवहार अशा अत्यंत गंभीर आणि बहुचर्चित प्रकरणांच्या तपासामध्ये गोवा पोलिस नापास झाल्याचाच अनुभव जनतेला घ्यावा लागलेला आहे. राज्य पोलिस उत्कृष्ट कामगिरीपेक्षा भलत्याच कारनाम्यांसाठीच प्रसिद्धी माध्यमात जास्त झळकलेत. परिणामी, अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. आज या स्थितीत खूप काही सुधारणा झाली आहे, असे नाही. गुन्हेगारांना सोडून पोलिस अधिकार्‍यांवरच कारवाई करण्याची नामुष्की वरिष्ठांवर येत आहे. 2010 मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अडकल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक

आशिष शिरोडकर यांच्यासह अन्य पाच पोलिस साथीदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. पोलीस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली 13 जानेवारी 2011 रोजी निलंबित केले होते. कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट हल्ला प्रकरण चुकीचे हाताळणी केल्याचा ठपका ठेऊन जानेवारीत पोलिस निरीक्षक नोलास्को रापोसो यांना निलंबीत केले होते. पणजी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उत्क्रांतराव देसाई यांनी सेवेत निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मार्च 2022 मध्ये निलंबित केले होते. जुलै 2022 मध्ये साळगाव येथील रेस्टॉरंटमध्ये दादागिरी केल्याच्या कारणावरून आठ पोलीसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. तसेच एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक विराज पवार यांना निलंबित केले होते.

पोलिसांवर तपास कामात कुचराई केलाचे आरोप वारंवार होतात. ज्या पद्धतीने तपासाची चक्रे फिरायला हवी होती, तशी फिरत नाहीत. एक तर ती वेगळ्याच दिशेने फिरतात किंवा योग्य दिशेने उशिरा फिरतात. त्यामुळे आरोपींना सावरायला पुरेसा वेळ मिळतो, पुरावे नष्ट करता येतात, पळवाटा शोधता येतात. परिणामी न्यायालयात खटले उभे राहूनही कच्चे दुवे राहिल्यामुळे आरोपींना जेवढी कठोर शिक्षा व्हायला हवी होती तेवढी होत नाही. काहींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता होते. त्यामुळे हे सर्व 'अर्थ'पूर्ण व्यवस्थापन असते का, अशी शंका येते. सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री, टिकटॉक स्टार सोनाली फोगाट खून प्रकरणी देखील पोलीस तपास समाधानकारक नसल्याचे आरोप होत आहेत. हैद्राबाद पोलिसांनी गोवा पोलिसांवर ताशेरे ओढून एक प्रकारे त्याला पुष्टीच दिली आहे.या पार्श्वभूमीवर बहुचर्चित जुन्या प्रकरणांकडे पाहिले असता गोवा पोलिसांच्या तपासाची कामगिरी निराशाजनकच म्हणावी लागते.

सिद्धी नाईक

12 ऑगस्ट 2021 रोजी संपूर्ण गोवा पुन्हा एकदा हादरला होता. कळंगुट समुद्रकिनारी 19 वर्षीय सिद्धी नाईक या तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता. ती एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत होती. तिच्या वडिलांनी कामावर जाण्यासाठी बसस्थानकावर सोडल्यानंतर तेथून ती बेपत्ता झाली होती. दुसर्‍या दिवशी कळंगुट किनारी ती मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी आत्महत्या, अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र, अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने गोव्यात खळबळ उडाली होती. या तरुणीला न्याय मिळावा म्हणून राज्यभरात लोकांनी आंदोलने केली. जवळपास 4 महिन्यांच्या कालावधीनंतर पोलिसांनी 28 डिसेंबर 2021 रोजी एफआयआर नोंदवला होता. मात्र, खुनाच्या आरोपाला पुष्टी देणारे पुरावे नाहीत, असे कारण देत ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेतला.

सोनाली फोगाट

टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे मृत्यूप्रकरण सध्या गाजत आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत संशय व्यक्‍त करण्यात आल्याने 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल करून घेतली आणि हत्येचे कलमही त्यात जोडले. सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्यांचा मित्र सुखविंदर यांच्यासह 5 जणांना अटकही केली. मात्र, गोवा पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर कुटुंबीय समाधानी नसल्याचे त्यांची मुलगी यशोधरा फोगाट हिने म्हटले आहे. सोनाली यांच्या अकस्मात मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे. या प्रकरणी तरी पोलिस पारदर्शी तपास करून आरोपींना कडक शिक्षा मिळण्याच्या दृष्टीने सबळ पुरावे गोळा करतील, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news