

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पणजी स्मार्ट सिटी म्हणून विकसीत होत असताना पहिल्याच पावसात पणजी शहरातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्याचप्रमाणे गटारांवरील फरशा फुटल्या आहेत. पणजी महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पणजीत व परिसरातील रस्त्याकडेला पाईपलाईनसाठी खोदलेले चर उघडे पडले आहेत. ते चर बुजवण्यासाठी टाकलेले दगड, सिमेंट व डांबर वाहून गेले आहे. पणजी बसस्थानक, लेखा संचालनालयाच्या पेट्रोल पंपजवळील पेव्हर्स उखडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिनाभरापूर्वी डांबरीकरण केलेले रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना बरीच कसरत करावी लागत आहे.
राज्यात मान्सून सुरू होऊन बारा दिवस झाले असले, तरी पावसाला जोर नव्हता. हवामान खाते ऑरेंज अलर्ट देऊन पुढील चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत असले तरी मुसळधार पाऊस पडला, तरी तो सलगपणे पडत नाही. आज दि.25 रोजीही असाच विसावा घेऊन पाऊस पडत होता. सकाळी जोरदार पावसाच्या सरी आल्या. मात्र दुपारनंतर त्या कमी कमी होत गेल्या. हवामान खात्याने पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.
कुणालाही विचारले तर ते हेच सांगत आहेत की राज्यात पाऊस उत्तम पडत आहे. कारण सध्या पाडणारा पाऊस हा थांबून थांबून विसावा घेऊन पडत आहे. एक जोरदार पावसाची सर येते व अर्धातास कोसळून नंतर तासभर हवामान खुले होते. त्यामुळे शेतीची कामे करता येतात. आठवडा बाजारात उघड्यावर भाजी व इतर वस्तू विकण़ार्यांना बाजार करता येतो. सर्व सामान्य लोकांना पावसाची सर येऊन गेल्यानंतर आपली कामे उरकता येतात. त्यामुळे सर्वजण यंदा पाऊस उत्तम पडतो, असे म्हणत आहेत.