गोवा : परंपरागत कलेला कल्पकतेची झळाळी

गोवा : परंपरागत कलेला कल्पकतेची झळाळी
Published on
Updated on

मडगाव;  रतिका नाईक :  कला ही माणसाचे व्यक्तिमत्त्व घडविते.कलेमुळेच माणसाचा प्रवास बाह्यरुपाकडून अंतरंगाकडे होतो. परंतु याच कलेला जेव्हा संधी मिळते, तेव्हा ती जगासमोर स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. काकोडा येथील सोनाली परवार या कोणत्याही वस्तूची प्रतिकृती बांबूपासून बनवितात. परंपरागत अंगात असलेल्या कलेची जपणूक करीत त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. नुकतेच त्यांनी आसाम येथील प्रशिक्षणातही सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचे केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याच्या अधिकार्‍यांनीही कौतुक केले.

सोनाली यांचे कुटुंबीय परंपरागत बांबू काम करतात. त्यांना मदत करता करता लहानपणापासून बांबूपासून सुरेख, सुंदर, वैविध्यपूर्ण कलाकृती करण्याची कला त्यांनी आत्मसात केली. सोनाली यांची खासियत म्हणजे, त्या कोणत्याही वस्तूची बांबूपासून हुबेहूब प्रतिकृती तयार करतात. आतापर्यंत त्यांनी समई, बास्केट, क्लिप, आरसा, फुलदाणी, घड्याळ अशा अनेक वस्तू तयार केलेल्या आहेत.
सोनाली यांनी बांबूपासून तयार केलेली मोठी समई मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेट म्हणूनही दिली आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही अपार कष्टाच्या जोरावर सोनाली हळूहळू या क्षेत्रात पुढे जात आहेत. केवळ परंपरागत व्यवसायातून स्वत:च्या कल्पकतेतून त्या अत्यंत सुबक अशा वस्तू साकारतात. सध्याच्या चायनिज बनावटीच्या काळातही त्यांनी दिवाळीत बांबूपासून बनविलेले आकाश कंदील लक्षवेधी असेच असते.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने आसाम येथे नुकतेच बांबू प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतले. देशभरातील 15 जणांच्या पथकात त्यांची निवड झाली होती. या शिबिरात सोनाली यांनी सहभाग घेतला होता. तो नवे काहीतरी शिकण्यासाठी पण या शिबिरात त्यांनी दाखविलेला उत्साह आणि त्यांच्या अंगी असणारी कला पाहून प्रशिक्षक व अधिकारीही थक्क झाले. प्रशिक्षणार्थी म्हणून या शिबिरात सहभागी झालेल्या सोनाली तिथे प्रशिक्षक कधी बनल्या हे त्यांनाही समजले नाही.

आसाम येथील शिबिरासाठी निवड झाल्यानंतर सोनाली यांना हस्तकला महामंडळाकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात सरकारी व्यवस्थेचा त्यांनाही फटका बसला. हस्तकला महामंडळाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसतानाही त्या नाउमेद झाल्या नाहीत. त्यांनी या प्रशिक्षण शिबिरात हजेरी लावली आणि यशस्वीपणे पूर्णही केले. सोनाली यांना प्रशिक्षण घेण्याबरोबर येथील सदस्यांना प्रशिक्षण देण्याचीही संधी अनेकदा मिळाली. आयोजकाद्वारे प्रमाणपत्राबरोबरच तिचे भरभरून कौतुकही करण्यात आले. गोव्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याने सरकारने सोनालीच्या कलेची दखल घेणे आवश्यक आहे.

लोकांना आवडणार्‍या वस्तू बनविण्याचा प्रयत्न

प्रत्येकात कला असते. ती कला जपणे, त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. बांबू कला ही आमच्या रक्तातील कला आहे. आम्ही परंपरागत बांबूपासून वस्तू बनविण्याचे काम करीत आलो आहोत. मात्र, बदलत्या काळानुरुप वावरताना लोकांना आवडतील अशा वस्तू बनविण्याचा माझा प्रयत्न आहे. पूर्वी आम्ही काही ठराविक वस्तू तयार करीत होतो. मात्र, काळानुसार बदलताना आम्ही विविध वस्तू अधिक आकर्षक कशा बनविता येतील यावर सातत्याने विचार करीत आहोत, असे सोनाली यांनी सांगितले.

पदवी पूर्ण करणार

शासनाच्या हस्तकला महामंडळातर्फे सोनाली यांनी गावागावांत महिलांसाठी बांबूपासून तयार करण्यात येणार्‍या कलाकृती शिकविण्याची शिबिरेही घेतलेली आहेत. सोनाली या विषयात पदवी नसतानाही वस्ताद आहे. मात्र, हाती पदवी नसल्याने तिला शासनाच्या दरबारी रिक्त जागा असूनही नोकरीसाठी किंवा संबंधित अन्य सुविधांसाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे सोनालीने आगामी काळात पदवी प्राप्त करण्याचे ध्येय उरी बाळगले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news