

म्हापसा; रमेश नाईक : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणानंतर गोवा सरकार खडबडून जागे झाले आहे. सोनाली यांना पाण्यातून अमली पदार्थ देण्यात आला होता, असे सोनालीच्या स्वीय साहाय्यक सुधीर सांगवान याने हणजूण पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अमली पदार्थ विरोधी कडक धोरण अवलंबले आहे.
पोलिसांना गोवा ड ग्ज मुक्त करण्यासाठी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत गोवा पोलिसांनी या वर्षीच्या गेल्या आठ महिन्यांत जेवढ्या कारवाया झाल्या, त्याच्या दुप्पट कारवाया केल्या. हणजूण पोलिसांनी या वर्षी गेल्या जानेवारीपासून आजतागायत पोलिस स्थानक क्षेत्रात अमली पदार्थ विरोधी कारवाया करून अंदाजे दोन कोटी 70 लाखांचा अमली पदार्थ जप्त केला. या पोलिस स्थानक क्षेत्रात मार्ना शिवोली, ओशेल शिवोली, सडये शिवोलीचा काही भाग, हणजूण-कायसूव, आसगाव व हडफडे पंचायत क्षेत्राच्या काही भागांचा अंतरभाव आहे. या पंचायत क्षेत्राच्या काही ठिकाणी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करून आतापर्यत अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 14 गुन्हे नोंद करून 19 संशयितांना गजाआड केले.
अटक केलेल्या संशयितांमध्ये स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांची संख्या जास्त असून, त्यातही विदेशी नागरिकांचा अंतर्भाव आहे.अटक केलेल्या 19 जणांपैकी नऊ संशयितांना गेल्या पंधरा दिवसांत सहा गुन्ह्यात अटक केली आहे. दहा संशयितांना गेल्या आठ महिन्यांत आठ गुन्हे नोंद करून अटक केली आहे. या व्यवसायात पुरवठादार बाहेरचे असले तरी काही स्थानिकही या व्यवसायात जम बसवून आहेत.
यातील काही जण याच व्यवसायातून बक्कळ पैसा कमावून हॉटेल व बांधकाम व्यवसायात उतरलेले आहेत. या सर्वांचे स्थानिक पोलिसांशी लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा किनारी भागात सुरू आहे.
काही वर्षांपूर्वी अमली पदार्थाच्या व्यवहाराच्या वर्चस्वावरून एकाचा खून झाला होता. ज्याच्या हातून खून झाला त्यालाही भाडोत्री मारेकर्याकडून गोळी घालून मारण्यात आले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम
सुरू करून या व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी याच अमली पदार्थाच्या वर्चस्वावरून एका नायजेरियन नागरिकाचा खून झाला होता. त्यावेळी गोव्यातील नायजेरियन नागरिकांनी पर्वरी येथे रस्ता अडवून धुडगूस घातला होता.