गोवा : नावेलीत 20 लाखांच्या ऐवजावर डल्ला

गोवा : नावेलीत 20 लाखांच्या ऐवजावर डल्ला

मडगाव (गोवा) : पुढारी वृत्तसेवा
नावेली येथे सोमवारी रात्री बंगला फोडून सुमारे 20 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारण्यात आला. चोरीनंतर चोरटे रेल्वेने पसार झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा सुगावा लागतो का या दृष्टीने तपास सुरू आहे. आठवड्याभरात तीन ठिकाणी चोर्‍या झाल्यामुळे नागरीकांमध्ये भिती आहे.

कुर्टी-फोंडा येथे 23 मे रोजी दिवसाढवळ्या फ्लॅट फोडून सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. त्याअगोदर केपे (जि. दक्षिण गोवा) येथे 20 मे रोजी मंदिरातील दानपेटी दिवसाढवळ्या फोडली होती. दानपेटीतून सुमारे 40 हजारांची रक्कम लंपास केली होती. आता नावेलीत चोरी झाली आहे. ही घरफोडी सोमवारी संध्याकाळी 7 ते रात्री 1 च्या दरम्यान झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आसिफ शेख बंगल्याचे मालक आहेत. चोरीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांना वाटते. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी झाली तेव्हा आसिफ परिवारासह भावाच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेले होते. त्यांनी पत्नीसह बहिणीचे, भावाच्या पत्नीचे दागिने घरात ठेवले होते. घरात कोण नसल्याची माहिती चोरट्यांना असावी, असा पोलिसांचा अदमास आहे. घटनास्थळी पाहता बंगल्यात प्रवेशासाठी चोरट्यांनी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे ग्रील्स आणि काच काढल्याचे दिसते.

स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपल्यावर रात्री 1 वाजता घर गाठले असताना आसिफ यांना घरफोडी झाल्याचे समजले. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी पोलिसांना याची माहिती त्वरित दिली. यानंतर श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी येऊनही तपास केली. 2018 आणि 2020 मध्येही या परिसरात चोरीचे प्रकार घडले होते. कोंकण रेल्वे स्थानक जवळच असल्याने चोरटे हात साफ करून पळूनही गेले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा सुगावा लागतो का या दृष्टीने तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news