गोवा : दाबोळीत पर्यटकांना नऊ लाखांना लुटले

गोवा : दाबोळीत पर्यटकांना नऊ लाखांना लुटले
Published on
Updated on

वास्को; पुढारी वृत्तसेवा :  पर्यटकांना लुटण्याचे प्रकार राज्यात सर्रास सुरू आहेत. दाबोळी विमानतळावर दोन पर्यटक कुटुंबीयांना सुमारे नऊ लाख रुपयांना लुटले. समाजमाध्यमांत या घटनेची एकच चर्चा सुरू आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बंगळुरू आणि हैदराबाद येथून कुटुंबीय आलेले होते. त्यांना भाड्याने टॅक्सी मिळवून देतो, असे सांगत चर्चेत गुंतवून ठेवले. दरम्यान, त्यांचे साहित्य परस्पर पळवून नेले. त्यामध्ये रोख रक्कम आणि अन्य ऐवज याची एकत्रित किंमत 8 लाख 70 हजार पेक्षा जास्त होते.

आंध्रप्रदेशातील बी. एन. शाह अली आणि कुटुंबीय बंगळूर विमानतळावर आले. तेथून ते दाबोळी विमानतळावर आले. याच विमानातून श्रीनगरच्या साजद अहमद भट आणि कुटुंबीय आले होते. या दोन्ही कुटुंबीयांना लुबाडण्यात आले. भाड्याने स्वस्तात टॅक्सी देतो, या चर्चेत गुंतवून ट्रॉलीवरून येणार्‍या त्यांच्या बॅगा पळवण्यात आल्या. चोरीप्रकरणी संबंधितांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकावर रविवारी सायंकाळी तक्रारी नोंदविल्या आहेत. या प्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकाने  अज्ञाताविरोधात भादंस 379 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी वास्को उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही. पाटील तपास करीत आहेत. या चोरीप्रकरणी तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज तपासले जात आहे.

शाह अली कुटुंबीय आगमन प्रवेशद्वारातून बाहेर आल्यावर ते टॅक्सी सेवेसाठी चौकशी करीत होते. त्यावेळी तेथे आलेल्या अज्ञातांनी त्यांना स्वस्त दरात भाड्याची टॅक्सी पाहिजे काय अशी विचारणा केली. तथापि ते तेथे असलेल्या टॅक्सी काऊंटरवर ट्रॉली घेऊन निघाले. या गडबडीत संबंधित अज्ञात व्यक्तीने त्या ट्रॉलीवर ठेवण्यात आलेली काळ्या रंगाची हँडबॅग लंपास केली. त्यामध्ये 70 हजार रुपये रोख रक्कम, सात लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, एटीएम कार्ड, आधार कार्ड वगैरे होते. ही घटना रात्री साडे नऊ ते दहा या वेळेत झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

अशीच घटना श्रीनगरच्या भट यांच्या बाबतीत शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान घडली. भट हे कुटुंबासह दाबोळी विमानतळावर उतरले होते. त्यानंतर ट्रॉलीवर सामान ठेऊन ते आगमन प्रवेशद्वारातून बाहेर आले. त्यांच्याजवळ आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना स्वस्तामध्ये भाड्याची टॅक्सी हवी काय अशी विचारणा केली. तथापि ते टॅक्सी काऊंटरकडे जात असताना त्यांनी ट्रॉलीमध्ये ठेवलेली काळ्या रंगाची हँडबॅग कोणीतरी लंपास केली. त्या बॅगेत अकरा हजार रोख रक्कम, एक सोन्याची अंगठी, डेबिट कार्ड, मोबाईल फोन, आधार कार्ड, इतर कागदपत्रे होती असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दाबोळी विमानतळावर उतरणारे काही पर्यटक तेथील टॅक्सी काऊंटरून टॅक्सी बुक करण्याऐवजी विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या इतर टॅक्सीवाल्यांकडे संपर्क साधतात. वास्कोबाहेरील काही टॅक्सीवाले पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर आल्यावर टॅक्सी विमानतळाबाहेरील महामार्गकडेला उभ्या करतात. त्यानंतर कोणा पर्यटकाला भाड्याने टॅक्सी हवी काय यासाठी ते दाबोळी विमानतळ परिसरात फिरतात. काही वेळा तेथे त्यांना भाडे देणारे एजंटही असतात. स्वस्त दरात टॅक्सी उपलब्ध होत असल्याने काहीजण ट्रॉलीवर सामान लादून विमानतळाबाहेर येतात. असा काहीसा प्रकार त्या दोघा पर्यटकांच्या बाबतीत घडला काय यासंबंधी पोलिस तपास करीत आहेत.

सोबत दागिने आणले कारण…

पर्यटक म्हणून येताना एवढे दागिने सोबत का आणले यासंबंधी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पर्यटनासाठी जात असल्याने घरी कोणी नसतील. त्यामुळे तेथे चोरी होण्याची भीती वाटल्याने संबंधिताने दागिने सोबत आणले, असे उत्तर मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news