गोवा : दक्षिणेत रंगतोय राजकीय वाद

गोवा : दक्षिणेत रंगतोय राजकीय वाद
Published on
Updated on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  मोप विमानतळाच्या नामकरणावरून दक्षिण गोव्यात राजकीय मतभेद उफाळून आला आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या मोप विमानतळाला डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव द्यावे, या मागणीला दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी समर्थन दिले; मात्र, चर्चिल आलेमाव यांचे पुतणे आणि विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी मात्र नावात काय आहे, असे विचारत नाव कोणाचेही असू द्या सरकार बदलले की विमानतळाचे नाव बदलले जाईल, असा सूचक इशाराच त्यांनी दिला.

मोप विमानतळाच्या नामकरणावरून राज्यभरात बराच राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. भाजपच्या गटातून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव समोर येत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी तशी मागणी उघडपणे केलेली नाही. माजी आमदार आणि भाजपचे नेते दामू नाईक यांना विचारले असता, आपण याबद्दल काहीही बोलू इच्छित नाही, असे स्पष्ट केले आहे. पर्रीकरांच्या नावाबद्दल भाजपाचे नेते आग्रही नाहीत. यावरून बरेच तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेंत.

नुकतेच भाजपात प्रवेश केलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना विचारले असता, आपण कितीही सांगितले तरी माझ्या शब्दाला आता किंमत कुठे आहे? जे केंद्र सरकार ठरवणार त्याला आपला पाठिंबा असेल, असे सांगितले. नुकतेच बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी मोपला कोकणीचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. याबद्दल खासदार फ्रान्सिस सार्दीन यांना विचारले असता, त्यांनी सिक्वेरा यांच्या नावाला समर्थन दिले आहे. जॅक सिक्वेरा यांच्यामुळे जनमत कौल गोव्याच्या बाजूने झाला. ते नसते तर पर्रीकरांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नसती, असे सांगत त्यांनी पर्रीकरांच्या नावाला विरोध केला.

विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी मात्र नाव कोणाचेही द्या. पण भविष्यात दोन्ही विमानतळे एकाच बरोबर चालू शकणार नाही असे सांगून दोन पैकी एक विमानतळ बंद पडेल, असे सांगितले. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथे नवीन विमानतळ येताच पूर्वीचे विमानतळ बंद पडल्याचा इतिहास आहे. गोव्याच्या बाबतीत हे शक्य आहे, असे ते
म्हणाले.

एसटीचे नेते आणि मडगाव नगरपालिकेचे भाजप पुरस्कृत नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी पर्रीकर आणि जॅक सिक्वेरा यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे सांगितले. पर्रीकर यांची नेता म्हणून जगात ओळख आहे. मोपला पर्रीकरांचे नाव द्यावे. कारण ते भाजपाचे नेते आहेत म्हणून नाही तर मोप विमानतळाचे ते शिल्पकार आहेत म्हणून, असे कामिल म्हणाले.

मंत्रिमंडळ चर्चा करून निर्णय घेईल : तानावडे

पणजी :  मोप विमानतळाला कोणाचे नाव द्यावे याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. गरज पडल्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सल्लाही घेतला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. मोप विमानतळाचे नाव काय असावे याबाबत अद्यापही सरकारने ठरवले नाही किंवा भाजपाने काही ठरवलेले नाही. विविध मागण्या पुढे येत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांचे सहकारी योग्य ती चर्चा करून विमानतळाचे नामकरण करतील. मगो पक्षाचे आमदार व वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोप विमानतळाला द्यावे, अशी जी मागणी केली आहे. त्याबाबत आपण काही बोलू शकत नसल्याचे तानावडे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news