

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील बहुचर्चित गोवा डेअरीच्या संचालक मंडळासाठीची निवडणूक चुरशीची झाली असून, 167 पैकी एक वगळता इतर 166 दूध उत्पादक संस्थांच्या मतदारांनी मतदान केले. कुर्टी – फोंडा येथील सहकार भवनमध्ये रविवारी ही निवडणूक झाली असून, 98 टक्के मतदान झाले. मतमोजणी फैसला आज, सोमवारी सकाळी होणार आहे.
या निवडणुकीत बारा संचालकांची निवड होणार असून, तब्बल अडतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यावेळच्या निवडणुकीत माधव सहकारी व श्रीकांत नाईक यांचे प्रत्येकी एक तर राजेश फळदेसाई व विनेबा देसाई यांचे संयुक्त असे एकूण तीन पॅनल निवडणुकीत उतरले आहेत. निवडणूक अधिकारी राजू मगदूम व इतर अधिकारी आणि कर्मचार्यांनी निवडणूक कामकाज हाताळले. गेल्या 2017 नंतर ही निवडणूक होत असून मागची साडेतीन वर्षे सरकारी प्रशासकानीच गोवा डेअरीचे कामकाज हाताळल्याने आता दूधउत्पादक अर्थातच लोकनियुक्त मंडळ गोवा डेअरीवर येणार आहे.
गोवा डेअरीच्या बारा संचालक निवडीसाठी एकूण 173 दूध संस्थांच्या अध्यक्षांना अधिकार आहेत. मात्र, त्यापैकी सहा दूध संस्थांना काही कायदेशीर कारणास्तव मतदानाचा अधिकार नाकारला गेला. त्यामुळे 167 मतदार पात्र ठरले; पण एकजण आजारी असल्याने मतदानासाठी येऊ शकला नाही, त्यामुळे 98 टक्के मतदान झाले.
गोवा डेअरीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने गोवा डेअरीला नफ्यात आणण्यासाठी खडतर प्रयत्न करण्याची गरज आहे. निवडणूक झाली हे खूप चांगले झाले; पण सरकारचे सहकार्यही गोवा डेअरीसाठी घ्यावे लागेल.
– माधव सहकारी, उमेदवारगोवा डेअरी नफ्यात आणण्या बरोबरच शिस्त लावण्यासाठीही यापुढे प्रयत्न व्हायला हवेत. सध्या गुरांसाठी गोवा डेअरीची खावड नाही त्यामुळे दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. असे प्रकार यापुढे घडू नये.
– राजेश फळदेसाई, उमेदवार