

वास्को : पुढारी वृत्तसेवा
झुआरीनगर येथील झुआरी अॅग्रो केमिकल लिमिटेडमध्ये एका टाकीचा बोल्ट काढण्यासाठी हॉट गॅस कटरचा वापर केल्याने त्या टाकीमध्ये तयार झालेल्या गॅसचा स्फोट झाला. मंगळवार (दि.3) रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट झाल्यामुळे तीनही कंत्राटी कामगार उंचावरून खाली फेकले गेले. सुमारे दहा मीटर उंचीच्या या टाकीवरून जमिनीवर आदळल्यानेे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना इस्पितळात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेत मरण पावलेले कामगार बोकारो इंडस्ट्रियल वर्क्स (देखभाल कंत्राटदार) चे कामगार आहेत. इंद्रजीत घोष (40) हा पर्यवेक्षक होता. तो मूळचा मदिनापूर पश्चिम बंगालचा आहे. मिथिरंजन चौधरी (28) हा कामगार मूळचा बिहारचा, तर काश करण सिंग ( 32) हा कामगार भिखीविंड कलसियन कलान पंजाबचा आहे. या कामगारांनी काम करताना कोणरत्याही सुरक्षा उपकरणाचा वापर केला नव्हता. त्यांनी बोल्ट काढण्यासाठी कोल्ड गॅस कटरचा वापर केला असता तर स्फोट झाला नसता. तसेच सेफ्टी बेल्टचा वापर केला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते यासारख्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने आसपासच्या वस्तीतील रहिवाशांना कंपनीतून गॅस गळती झाल्याचे वाटले. त्यांच्यामध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. तथापी, परिस्थिती लक्षात येताच सर्व काही स्थिरावले. वास्कोचे पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी स्थितीवर नियंत्रण आणले.
झुआरी अॅग्रो केमिकल लिमिटेडमध्ये एक प्लांट बंद करण्यात आला होता. त्या प्लांटची दुरुस्ती करण्याचे काम बोकरो इंडस्ट्रियल वर्क्सला देण्यात आले होते. अमोनिया प्लांटच्या बाष्पीभवन प्रक्रिया करणार्या टाकीवर ते तिघेजण मंगळवारी काम करीत होते. सुमारे दहा मीटर उंचीच्या व 300 घनमीटर क्षमतेच्या रिकाम्या टाकीवर काम करताना टाकीचे बोल्ट सैल करून वरचे मॅनहोल कव्हर उघडण्याच्या ते प्रयत्नात होते. टाकीच्या वरचा भाग साधारणपणे संपूर्णपणे बंद केलेला असतो. त्यामुळे तो बोल्ट काढण्यासाठी त्यांनी हॉट गॅस कटरचा वापर केला. त्यामुळे त्या टाकीमध्ये गॅस निर्माण होऊन टाकीमध्ये स्फोट झाला.
या जबरदस्त स्फोटामुळे ते उसळून टाकीपासून सुमारे 30 मीटर अंतरावर जमिनीवर आदळले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. स्फोटामुळे आसपासच्या इतर अधिकारी व कामगार तेथे पोहचले. त्यांनी त्वरित त्या तिघा जखमींना उपचारासाठी इस्पितळामध्ये नेण्यासाठी धावपळ केली. परंतू त्यांचे वाटेतच निधन झाले. कंपनीचे अधिकारी व बायलर तेथे आल्यावर त्यांनी पाहणी केली.
उष्णता किंवा ज्वाला न वापरता तसेच स्पार्क तयार न करता एखादी वस्तू कापण्यासाठी कोल्ड गॅस कटिंगचा वापर केला जातो. धोकादायक वस्तूंसाठी कोल्ड गॅस कटिंग प्रक्रिया सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र या ठिकाणी कामगारांनी बोल्ट काढण्यासाठी हॉट गॅस कटरचा वापर केल्यामुळे टाकीमध्ये गॅस निर्माण होऊन टाकीमध्ये स्फोट झाला.