गोवा : घरच्यांच्या भीतीमुळे अर्भक फेकले झाडीत; शिरवडेतील अल्पवयीन पीडितेची कहाणी

गोवा : घरच्यांच्या भीतीमुळे अर्भक फेकले झाडीत; शिरवडेतील अल्पवयीन पीडितेची कहाणी
Published on
Updated on

मडगाव; रतिका नाईक : कोवळ्या वयात शरीरसंबंध म्हणजे काय, हेही ठाऊक नसलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून मातृत्व लादल्याची घटना नुकतीच दक्षिण गोव्यात घडली होती. ही घटना ताजी असतानाच बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन पीडितेने मूल जन्मल्यानंतर घरच्यांच्या भीतीमुळे त्याच अवस्थेत अर्भकाला शिरवडे येथील निर्जनस्थळी नेऊन टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.

सविस्तर माहितीनुसार, ही सतरा वर्षीय मुलगी व तिचे कुटुंब अनेक वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहेत. मजूर वर्गातील हे कुटुंब आहे. डिसेंबरमध्ये नात्यातीलच एका व्यक्तीने तिच्यावर दोनदा बलात्कार केला. त्यातूनच ती गर्भवती राहिली. भीतीपोटी तिने याबाबत कुणाला माहिती दिली नाही. दरम्यान, मधल्या काळात पोट वाढत असल्याने तिच्या आईने डॉक्टरकडे जाऊ, असे सांगितले होते.

मात्र, त्या मुलीने आपल्याला काही त्रास होत नसल्याचे सांगून आईचे म्हणणे टाळले. घटनेच्या आधी दोन दिवसांपूर्वी तिला अतिसारचा त्रास होत होता. त्यावेळीही पोट बिघडले असावे, असाच घरच्यांनी अंदाज बांधला. दरम्यान, घटनेच्या दिवशी पहाटे शौचालयात गेल्यावर तिने अजाणतेपणी मूल जन्माला घातले. काय करावे ते कळेना. सुरुवातीला तिने खिडकीतूनच अर्भकाला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसे करणे शक्य नसल्याने गोंधळलेल्या स्थितीत तिने अर्भकाला एका कपड्यामध्ये गुंडाळून शिरवडे येथील झाडीत नेऊन ठेवले. पहाट असल्याने झोपेत असलेल्या घरच्यांना यातील काही समजलेही नाही. थोड्या वेळाने ते नवजात अर्भक रडू लागल्यावर त्या मुलीनेच आपल्या आईला उठवून अर्भक रडत असल्याची माहिती दिली. त्यांनतर शेजार्‍यांना जागवून पोलिसांना बोलावण्यात आले व अर्भक त्यांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी कहाणी आहे, त्या दुर्दैवी पीडितेची.

अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली ही पीडिता ज्याच्यासाठी त्यांच्या कुटुंबाची अब्रू म्हणजेच सर्वकाही असते. आईला सांगितल्यास बोलणीच खावी लागणार, म्हणून तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कुणाकडे वाच्यता केली नाही. याचा परिणाम भयंकर होऊ शकतो, याची तिला जाण नसावी. शिवाय पालकही मजूर वर्गातील असल्याने त्यांनीही मुलीच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.

संशयिताला पाच दिवसांची कोठडी

सध्या कोलवा पोलिसांनी त्या नराधमास अटक केली असून, गुन्हा नोंद केला आहे. तर नवजात अर्भकाला सोडून दिल्याप्रकरणी मडगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंद आहे. सध्या अर्भक तसेच अल्पवयीन आईला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. तर संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ज्या खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात या पीडितेला या दिव्यातून जावे लागले आहे.

न्याय मिळण्यास विलंब नको : कुंकळ्येकर

सरकारने बलात्कार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना योग्य आरोग्य सेवा विशेषत: मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सेवा पुरविण्यात यावी. मूल जन्माला घालणे आणि नंतर त्यांना सोडून देणे यासारखी प्रकरणे (बलात्काराची प्रकरणे) ही एक गंभीर समस्या आहे. ती योग्यरीत्या हाताळली पाहिजेत. कारण पीडितांच्या मानसिक आरोग्याशी त्याचा खूप संबंध आहे. बलात्कार करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे आणि न्याय मिळण्यास विलंब होता कामा नये, असे केपे येथील अंबिका सिनाय कुंकळ्येकर यांनी सांगितले.

मडगाव पोलिसांनी त्वरित दखल घेऊन हे प्रकरण सोडवले म्हणून त्यांचे कौतुक आहे. कुटुंबाच्या दबावामुळे अशी प्रकरणे दाबली जातात आणि दिवसेंदिवस अशा प्रकरणात वाढ होत राहते. जोपर्यंत तोंड उघडले जाणार नाही तोपर्यंत अशा घटनांवर बंदी येणार नाही.
आवदा व्हीएगस, अध्यक्ष, बायलांचो एकवट

राज्यातील महिलांप्रति सुरक्षा व्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने गावोगावी, शाळांत जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. सरकारला शक्य नसल्यास बिगर सरकारी संस्थांना या कामासाठी नेमावे. आपण यासाठी शिक्षण विभागाला निवेदन सादर करणार आहे.
तारा केरकर, अध्यक्षा, सवेरा संस्था

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news